20 हजार कोटीचा दंड ठोठावण्याची मागणी : सर्व व्यवसायावर बंदीची शक्यता
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यूयॉर्क येथील न्यायालयात सोमवारी खटला चालला आहे. ट्रम्प यांनी 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 832 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. स्वत:ची जमीन, मालमत्तेची खोटी माहिती देत स्वत:च्या संपत्तीचे मूल्य वाढविल्याचा आरोप आहे.
न्यूयॉर्क अॅटर्नी जनरल लेटीटिया जेम्स यांनी ट्रम्प यांच्याविरोधात हा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी न्यायाधीश आर्थर एफ. एंगोरोन सुनावणी करत आहेत. ट्रम्प यांना 20 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला जावा अशी मागणी लेटीटिया यांनी केली आहे. याचबरोबर त्यांनी ट्रम्प तसेच त्यांचे दोन्ही पुत्र डोनाल्ड ज्युनियर आणि एरिक यांच्या न्यूयॉर्कमधील सर्व व्यवसायांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ट्रम्प अणि त्यांच्या ऑर्गनायझेशन विरोधात 5 वर्षांची कमर्शियल रियल इस्टेट बंदी लादली जावी असेही लेटीटिया यांनी म्हटले आहे.
मालमत्तेचे मूल्य वाढवून दाखविले
2011-21 दरम्यान बँक कर्ज अणि कमी विमा हप्त्यासाठी स्वत:च्या मालमत्तेचे s मूल्य वाढवून दाखविले होते असा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. ट्रम्प यांनी स्वत:ची रियल इस्टेट प्रॉपर्टी म्हणजेच ट्रम्प टॉवर, मार-ए-लागो, त्यांचे कार्यालय आणि गोल्फ क्लब्सचे मूल्य अधिक दाखविले आणि स्वत:ची एकूण संपत्ती सुमारे 18.3 हजार कोटींपर्यंत वाढविल्याचा दावा आहे. जानेवारी महिन्यात न्यूयॉर्कच्या एका न्यायाधीशाने ट्रम्प यांच्याविरोधातील खटला फेटाळण्यास नकार दिला होता.
ट्रम्प यांनी फेटाळले आरोप
खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वी ट्रम्प हे प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. हा खटला म्हणजे केवळ राजकीय हल्ला आहे. डेमोक्रेट्स स्वत:च भ्रष्ट आहेत. न्यायाधीश आर्थर देखील डेमोक्रेट्ससाठी पक्षपात करत आहेत. त्यांना बडतर्फ केले जावे. आर्थर हे 2024 च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्वत:ची अन् कुटुंबाची प्रतिष्ठा भ्रष्ट डेमोक्रेट्सपासून वाचवू पाहत आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्यावर कॅपिटॉल हिंसा, व्हाइट हाउसमधील गोपनीय दस्तऐवज स्वत:च्या घरी नेणे, जॉर्जियाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा आरोप आहे.









