अध्याय एकोणतिसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा माझा भक्त अत्यंत समाधानी असतो. सर्वांच्यात मला पाहणे ह्यातच त्याची भक्ती सामावलेली असते. त्याला सर्वत्र माझेच दर्शन होत असल्याने समोर कुणी दुष्ट माणूस आला तरी तो त्याला बिलकुल भीत नाही. सर्वत्र मला पाहणे अशी माझी चौथी भक्ती करणारा भक्त निर्भय असतो. हेच त्याचे मुख्य लक्षण होय. त्याचा निर्भयपणा पाहून मीच त्याला वंदन करतो आणि मोक्ष आपणहून त्याचे पाय पकडतो. योग, याग, ज्ञान, ध्यान ही सगळी मला प्राप्त करून घेण्याची साधने आहेत पण मला प्राप्त करून घेण्याच्या साधनांपेक्षा मुख्य साधन कोणते असे विचारशील तर माझी चौथी भक्ती करणे हेच निर्विवादपणे उत्तम साधन होय. एखादी सदाचारी व्यक्ती किंवा पापकर्म करणारी व्यक्ती ह्या दोघानाही समान मानून जो त्यांच्यात भगवद्भाव पाहतो तो शुद्ध स्वभावाचा असतो. त्याला मनुष्याच्या ठिकाणी असलेले गुणदोष सरळ सरळ दिसत असतात तरीसुद्धा, तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सर्वांच्यात ब्रह्मरूप पहात असतो. चौथी भक्ती करणारा भक्त समोरच्या माणसातले गुणदोष पहात नाही त्यालाही कारण आहे. तेही तुला सविस्तर सांगतो. एकूण चौऱ्यांशी लक्ष योनी आहेत. त्यातील त्र्यायशीं लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी ह्या गुणदोषांपासून मुक्त आहेत कारण ते त्यांच्या नैसर्गिक स्वभावानुसार वागत असतात पण मनुष्य म्हंटला की त्याच्या ठिकाणी गुणदोष हे असणारच. त्यात नवीन असं काहीही नाही. विशेष म्हणजे माणसाच्या ह्या गुणदोषांचं दर्शन उघड उघड होत असतं.
असं असताना समोर दिसणाऱ्या जगाची निरर्थकता जाणून जो माणसाच्या ठिकाणचे दोष पहात नाही तो देही असून विदेही असतो असं ठामपणाने म्हणता येतं. देही असून विदेही असलेला शुद्ध स्वरूपाचा महात्मा इतका भाग्यवान असतो की, समोर दिसणाऱ्या प्रत्येकात त्याला फक्त ब्रह्मभावच दिसत असतो.
अशा महात्म्याच्या समोर चारही मुक्ती दास्यभावाने उभ्या असतात. जणूकाही तो त्यांचा राजाच असतो. जो सर्व भूतात नेहमीच भग्वद्स्वरूप पहात असतो त्या महात्म्याचा देहाभिमान क्षणार्धात नाहीसा होतो. त्याचा देहाभिमानच नष्ट होतो असं नाही तर त्याबरोबर असलेले देहाभिमानाचे कुटुंबीयसुद्धा तोंड काळे करून निघून जातात. देहाभिमान म्हणजे स्वत:च्या विचारांविषयी, कर्तृत्वाविषयी वाटणारा अभिमान! त्यातून माझ्यासारखा मीच अशी खात्री वाटू लागते. ह्या खात्रीला कुठतरी ठेच लागली की, आपोआपच स्पर्धा, असूया, तिरस्कार वाढीस लागतात. कारण ह्या सर्वांचा देहाभिमानाच्या कुटुंबियात समावेश होतो. स्वत:च्या देहाबद्दल वाटणारी ममता हाच अभिमान होय. साहजिकच आपल्यासारखा दुसरा कोण ज्ञानी भेटला की त्याची आपोआप निर्भत्सना केली जाते. जेणेकरून तो आपल्या स्पर्धेत कुठे टिकू नये अशी भावना त्यापाठीमागे असते. तो आपल्यापेक्षा कुणी श्रेष्ठ ठरू नये म्हणून असूयेपोटी त्याच्या ठिकाणी अनेक दोष चिकटवले जातात.
तिरस्कारापोटी जे भाविक साधक असतात त्यांचा छळ करून त्यांच्या साधनेत विघ्न निर्माण करण्याचे कार्य केले जाते. म्हणून जेव्हा साधक सर्वांभूती भगवद्भाव पाहू लागतो तेव्हा अहंभाव म्हणजे स्वत:च्या देहाविषयी वाटणारी ममता नष्ट होते. ममता नष्ट झाली की, कुणाची निर्भत्सना करणे, कुणाच्यापोटी दोष चिकटवणे, कुणाचा तिरस्कार करून त्याच्या साधनेत विघ्न आणणे इत्यादि दुसऱ्याला त्रास होईल अशा गोष्टी करण्याची इच्छा आपोआपच नष्ट होते.
म्हणून उद्धवा सर्वाभूती समदृष्टी ठेवणे हेच माझे भजन होय आणि हेच माझ्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे हे निश्चित समज. ह्याप्रमाणे माझी भक्ती केली असता पूर्णब्रह्माचा लाभ होतो आणि ही गोष्ट नरदेहातच साध्य होते.
क्रमश:








