ओटीटी प्लॅटफॉर्म अमेजॉन प्राइम व्हिडिओची प्रसिद्ध वेबसीरिज ‘पाताल लोक’च्या यशामुळे जयदीप अहलावतच्या कारकीर्दीला मोठा वेग मिळाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्यांमध्ये जयदीप यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. जयदीप हा करीना कपूरसोबत अलिकडेच ‘जाने जान’ या चित्रपटात दिसून आला आहे. यातील त्याच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. जयदीप याचबरोबर सैफ अली खानसोबत काम करताना दिसून येणार आहे.
सिद्धार्थ आनंद यांच्या प्रॉडक्शन हाउसकडून सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. याचे दिग्दर्शन रॉबी ग्रेवाल करणार आहेत. या चित्रपटात जयदीप अहलावत यांचीही मुख्य भूमिका असणार आहे. जयदीप यात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचे समजते.
जयदीप याच्या ‘पाताल लोक’ या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच येणार असल्याचे मानले जात आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. याचबरोबर जयदीप हे अन्य काही वेबसीरिजमध्ये काम करत आहेत.









