ओरोस औद्योगिक प्रशिक्षण आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
ओरोस औद्योगिक प्रशिक्षण आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहर गडावर आयोजित करण्यात आलेल्या ‘किल्ले मनोहर गड स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या मोहिमेत गडावर जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडुपे साफ करण्यात आली. तसेच गडावरच्या वाटेवरील आणि लावलेल्या झाडांच्या भोवताली असलेले गवत काढण्यात आले. गडावरील पाषाणाच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच आवश्यक ठिकाणी मार्गदर्शक फलकही लावण्यात आले.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून निमित्त महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आयोजित ‘किल्ले स्वच्छ्ता अभियान’ या उपक्रमाचा एक भाग म्हणून ओरोस औद्योगिक प्रशिक्षण आणि दुर्ग मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही किल्ले मनोहर गड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने उपस्थितीतांना प्रतिष्ठानच्या गड व किल्ले संवर्धन कार्याची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेसाठी शिवापूर गावाच्या सरपंच सौ शेडगे, उपसरपंच श्री राऊळ, अनिल बांग आणि शिवापूर ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
या संयुक्त मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेचे दुर्ग रक्षक उपस्थित होते. तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल मोहारे, प्र. गटनिदेशक समीर गोरे, ज्येष्ठ निदेशक तुषार सावंत, गणेश गावडे, राजेश फोंडेकर, सुभाष कविटकर, तासिका निदेशक चिन्मय मुळे, देवेंद्र दळवी, निनाद बांदेकर, जाॅन फर्नांडिस, कर्मचारी राजा चव्हाण, जि. प. कर्मचारी रूपेश सावंत आणि विद्यार्थी उपस्थितीत होते.