मॉर्निंग वॉकर्स-नागरिकांना धोका, मनपा लक्ष देणार का?
बेळगाव : कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अलिकडे भटक्या कुत्र्यांकडून हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. याबाबत उपाय करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरताना दिसत आहे. केवळ दिखाव्यापुरती नसबंदीची मोहीम हाती घेतली जाते. मात्र प्रत्यक्षात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्स आणि इतर नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील लहान मुले आणि महिलांना या कुत्र्यांचा धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांचे कळप भर रस्त्यात बसत असल्याने ये-जा करणे देखील कठीण होवू लागले आहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी मनपा कायमस्वरुपी उपाययोजना करणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
शहरात हॉटेल आणि इतर व्यावसायिकांकडून खाद्यपदार्थ उघड्यावरच टाकले जात आहेत. त्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव वाढू लागला आहे. विशेषत: मांसाहारी हॉटेलसभोवती कुत्र्यांचा कळप दिसून येत आहे. दरम्यान अशी कुत्री बालकांवर हल्ले करू लागली आहेत. मात्र याबाबत मनपा प्रशासन उदासीन असल्याचे दिसत आहे. वर्दळीच्या ठिकाणीच कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या डोकेदुखीत भर पडली आहे. भटक्या कुत्र्यांसाठी मनपाने कायमस्वरुपी उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणीही होत आहे.









