राजस्थानमध्ये वंदे भारत ट्रेन रूळावरून उतरवण्याचा कट फसला, लोकोपायलटचे प्रसंगावधान
वृत्तसंस्था/ उदयपूर
राजस्थानमध्ये वंदे भारत रेल्वेच्या मार्गात अडथळा निर्माण करून घातपात करण्याचा मोठा प्रकार सोमवारी उघड झाला. रेल्वेरूळावर बरेच दगड ठेवून रेल्वेला अपघात घडवण्याचा कट आखण्यात आला होता. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यानुसार भिलवाडाजवळ उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस रूळावरून उतरवण्याचा मोठा कट रचण्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, सतर्क कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे ही मोठी दुर्घटना टळली. गाडी वेळेत थांबवली नसती तर रूळावरून घसरण्याची शक्यता होती. या अपघातामागे कोणाचे षड्यंत्र आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही मंगळवार वगळता आठवड्यातील इतर सहा दिवस धावते. उदयपूरहून सकाळी 7.50 वाजता निघालेली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ जयपूर येथे दुपारी 2.05 वाजता पोहचते. याच एक्स्प्रेसचा मोठा घातपात टळला आहे. लोको पायलटने दाखवलेल्या प्रसंगावाधानामुळे सुपरफास्ट वंदे भारत एक्स्प्रेसची मोठी दुर्घटना टळली. उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा घातपात घडवण्याच्या उद्देशाने ट्रॅकवर दगड-धोंडे आणि लोखंडी रॉड रचण्यात आली होती. या अडथळ्याच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकवऊन उलटवण्याचा कट होता. मात्र लोकोपायलटने योग्य वेळी धोका ओळखत रेल्वे थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोको पायलटला रेल्वेरूळावर दगड आणि इतर गोष्टी दिसल्यानंतर त्याने तातडीने रेल्वे थांबवली. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी समाजकंटकांनी रूळांवर मोठमोठे दगड आणि लोखंडी बार टाकल्याचे निदर्शनास आले. सर्व दगड आणि लोखंडी साहित्य रेल्वेमार्गावरून हटवल्यानंतर वंदे भारत पुढे मार्गस्थ करण्यात आली.
अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
काही राज्यांमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते. मात्र, आज राजस्थानमध्ये समोर आलेला प्रकार चिंताजनक आहे. याची दखल गांभीर्याने घेतली गेली असून या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेनंतर चित्तोडगड जिह्यातील गंगरारा पोलिस ठाण्यात अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी उदयपूर ते जयपूर दरम्यान वंदे भारत टेन सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रेल्वेवर दगडफेक करून डब्याच्या काचा फोडण्यात आल्या होत्या.