पुरातत्व-पुराभिलेखमंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती
पणजी : थेट शिवकालीन माहितीसह पोर्तुगीज आमदानीतील अत्यंत महत्वपूर्ण माहितीचा खजिना असलेले सुमारे 3 कोटी ऐतिहासिक दस्तऐवज खराब होऊ लागले असून ते स्वत:च इतिहासजमा होण्याच्या मार्गावर पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांचे वेळीच संरक्षण करणे गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली त्यांचे डिजिटायझेशन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यताही दिली आहे, अशी माहिती पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. या खात्यात सध्या सुमारे 3 कोटी महत्वपूर्ण दस्तऐवज आहेत. प्रत्यक्षात ती संख्या कितीतरी पट जास्त होती. पोर्तुगीजांनीसुद्धा ही कागदपत्रे स्वत:च्या ग्रंथालयांमध्ये काळजीपूर्वक जतन करून ठेवली होती. परंतु गत काही वर्षांमध्ये या खात्याकडे कुणी गांभीर्याने पाहिलेच नव्हते. त्यामुळे त्यातील बरेच दस्तऐवज चोरीला गेले आहेत, तर उर्वरित खराब होण्याच्या मार्गावर आहेत. असंख्य दस्तऐवजांचे कागद अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचले आहेत. त्यावर एकच उपाय म्हणजे या दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करणे. मात्र ही प्रक्रिया फार खर्चिक असते. त्यासाठी किमान 50 ते 60 कोटी ऊपये खर्च अपेक्षित आहे. परंतु दस्तऐवजांचे महत्व पाहता हा खर्च करावाच लागणार आहे, असे फळदेसाई म्हणाले.
60 हजार मोडी दस्तऐवज मराठीत अनुवादित
दरम्यान, राज्य सरकारने मोडी लिपीतील 60 हजार दस्तऐवज मराठीत अनुवादित करून घेतले आहेत. महाराष्ट्रातील काही तज्ञांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. गोवा सरकारच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे काम झालेले आहे. या दस्तऐवजांमध्येही गोव्यासंबंधी महत्वपूर्ण संदर्भ आणि भरीव माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात काही शिवकालीन दस्तऐवजही आहेत, त्यामुळे त्या इतिहासावर अधिक माहिती समोर येण्यात मदत होणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.