महाराष्ट्र शासनाचा निर्णय : आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या पाठपुराव्याला यश
विटा प्रतिनिधी
टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी 8 टीएमसी पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठीची अंतिम मंजुरी राज्य शासनाने दिल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले. यामुळे विस्तारीत टेंभू उपसा सिंचन योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठीचा मार्ग सुकर झाला आहे.
दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील 34 गावातील शेतक-यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार अनिलभाऊ बाबर हे गेली 3ते 4 वर्षापासून पाठपुरावा करीत होते. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास महाराष्ट्र शासनाने आज अंतिम मंजूरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आमदार अनिल बाबर याना आज वर्षा निवासस्थानी दिला.
कृष्णा खोऱ्यातील मंजूर असलेल्या अतिरिक्त पाण्यांपैकी टेम्भू साठीच्या २२ टी. एम. सी. पाणी वाटपाचे नियोजन पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे योजनेपासून वंचित नविन गावे आणि क्षेत्र वाढविण्यासाठी पाण्याची उपलब्धता नव्हती. त्यामुळे गेल्या 4 वर्षापासून आमदार अनिल बाबर आणि इतर लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत होते.
काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने ८ टी. एम. सी. अतिरिक्त पाणी टेंभू योजनेसाठी उपलब्ध करुन दिलेले होते. परंतू ही तत्वत: मंजूरी होती. तोपर्यंत विस्तारीत टेंभू उपसा सिंचन योजनेचा तृतीय प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल महाराष्ट्र शासनास ८ मे २०२३ रोजी सादर करण्यात आला होता. त्यासाठी 8 टी एम सी पाणी उपलब्धतेस अंतिम मंजुरी आवयक होती. ती मिळत नसल्याने सुप्रमा रखडली होती. आता विस्तारित योजनेसाठी आवश्यक8 टीएमसी पाण्याला मंजुरी मिळाल्याने सुप्रमा मिळण्यासाठी सर्वात मोठा अडथळा दूर झाला आहे. यामुळे टेंभू पासून वंचित गावांना हक्काचे पाणी मिळण्यासाठी तृतीय सु.प्र.मा. मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता
टेम्भू योजनेपासून वंचित गावांना पाणी मिळावे यासाठी सरकार सकारात्मक आहे. टेंभू योजनेच्या तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) कॅबिनेट मध्ये आणून लवकरच मान्यता दिली जाईल. – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.