भर पावसात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून परिसर स्वच्छता
रत्नागिरी : प्रतिनिधी
स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून ‘1 तारीख 1 तास’ ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमात एका हातात छत्री दुसऱ्या हातात झाडू घेऊन संततधार पावसात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय विश्रामगृह ते जयस्तंभ परिसराची स्वच्छता केली.
काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु असतानाही, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात आज जमा झाले होते. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राहूल देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
शासकीय विश्रामगृह, जिल्हा परिषद कमान, जेल रोड, शासकीय रुग्णालय, जयस्तंभ आदी परिसरात विविध पथकप्रमुखांच्या मदतीने स्वच्छता पथके तयार करण्यात आली होती. रेनकोट, छत्री यांच्या सोबतीने झाडू, फावडे आदी साधनांच्या सहायाने परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्लास्टिक बाटल्या, कागदी पिशव्या, अनावश्यक वाढलेले गवत आदी कचरा साफ करुन रत्नागिरी नगर परिषदेच्या कचरा कुंड्यांमध्ये जमा करण्यात आला. नंतर या कुंड्या नगर परिषदेच्या ट्रॅक्टरमध्ये रिकाम्या करण्यात येत होत्या.
शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी श्री. सिंह, पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता केली. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार आणि त्यांच्या पथकाने गणपतीपुळे येथे स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छता ही सेवा, 1 तारीख 1 तास या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम राबवितानाच जिल्हाधिकारी कार्यालयात सेल्फी पॉइंटही उभे करण्यात आले होते. या पॉईंटचा विविध अधिकारी, कर्मचारी, उपस्थित पत्रकारयांनी छायाचित्र घेत स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदविला.
सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय परिसर, राज्य परिवहन महामार्ग विभागीय कार्यालय, खेड बस स्थानक, चिपळूण बस स्थानक, राजापूर डेपो, लांजा बस स्थानक, मुख्य प्रशासकीय कार्यालय महावितरण, पंचायत समित्या, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, ग्रामपंचायत यांच्यामार्फतही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.