सचिव अंजुम परवेज : जि पं कार्यालयात दुष्काळ आढावा बैठक
बेळगाव
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्राम विकास पंचायतराज विभागाचे प्रधान सचिव व जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज यांनी दुष्काळ परिस्थितीची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. पाणी व चाऱ्याची कमतरता पडू नये, याची खबरदारी घेण्याची सूचना करून पाणीपुरवठा योजना त्वरित पूर्ण करण्यात याव्यात, असे अधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये शनिवारी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये सध्या झालेला पाऊस व जिल्ह्यातील पीकहानी याची माहिती त्यांनी जाणून घेतली. भविष्यात पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी नादुरुस्त झालेल्या कूपनलिका दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी केली. बहुग्राम पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण व्हावी, अनेक ठिकाणी संथगतीने सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.
राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या गॅरंटी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात याव्यात. वेगवेगळ्dया कारणांनी अनेक जणांना योजनांचा लाभ होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी त्वरित दूर करून योजनांचा लाभ करून द्यावा, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. तांत्रिक अडचणींमुळे समस्या निर्माण झाल्या असून त्या त्वरित दूर करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरांमध्ये अनेक विकासकामे राबविण्यात आली. पूर्ण झालेल्या योजना महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात याव्यात, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली. एक हजार कोटी रुपयांची योजना असून बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. योजना राबविण्यात बेळगावने देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे, अशी माहिती योजना अधिकारी आफरीन बानू बळ्ळारी यांनी बैठकीत दिली.
पावसामुळे घरे पडलेल्या नागरिकांना देण्यात आलेली भरपाई, पेन्शन योजनांचा लाभ व सकालअंतर्गत दाखल करण्यात आलेले अर्ज व निकालात काढण्यात आलेल्या अर्जांची माहिती निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये 95 टक्के पेरणी करण्यात आली होती. मात्र पावसाअभावी अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी 13 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. तर बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्येही पिकांची हानी झाली असून हे तालुकेही दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती कृषी अधिकारी शिवणगौडा पाटील यांनी दिली.
यावेळी जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, तालुका तहसीलदार, बागायत खाते, पशु संगोपन, अन्न व नागरी पुरवठा खाते आदी विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
बैलहोंगल तालुक्याला भेट
जिल्हा प्रभारी सचिव अंजुम परवेज व जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, महिला आणि बालकल्याण खात्याचे उपसंचालक नागराज आर. यांनी बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी येथील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तर तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीची माहितीही परवेज यांनी जाणून घेतली.
राज्य सरकारकडून कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडीमधील बालकांना तसेच गर्भवती महिलांना सकस धान्य वितरित करत आहे. संबंधित महिलांना अंगणवाडी केंद्रातून धान्याचे वितरण होत आहे की नाही, याची अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्यात आली. अंगणवाडी केंद्रातील सुविधा तसेच वितरण करण्यात आलेल्या धान्याची पाहणी करण्यात आली.









