भेंडी, ढबू, टोमॅटो, वांगी दर आवाक्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
यंदा समाधानकारक पाऊस नसला तरी अद्याप भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. किरकोळ भाजीपाला बाजारात भेंडी, फ्लॉवर, ढबू, टोमॅटो, वांगी आदी भाज्यांचे दर आवाक्यात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना खरेदी करणे सोयीस्कर झाले आहे. विशेषत: 15 दिवसांपूर्वी 70 रुपये प्रतिकिलो विकला जाणारा टोमॅटो आता 15 रुपयांवर आला आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात भेंडी 30 रुपये किलो, बटाटा 40 रुपये किलो, काकडी 60 रुपये, फ्लॉवर 20 रुपये, बिन्स 60 रुपये, ढबू 40 रुपये, गवार 60 रुपये, ओली मिरची 60 रुपये, वांगी 40 रुपये, टोमॅटो 15 रुपये, गाजर 60 रुपये, कारली 60 रुपये, दोडकी 60 रुपये, लाल भाजी 10 रुपयाला एक पेंडी, मेथी 15 रुपयाला एक पेंडी, पालक 20 रुपयाला चार पेंड्या, कांदापात 20 रुपयाला 6 पेंड्या, कोथिंबीर 10 रुपये पेंडी असा भाजीपाल्याचा दर आहे.
श्रावण आणि गणेशोत्सवात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे लिंबूंची मागणी थंडावते. मात्र आता गणेशोत्सव संपताच लिंबूंच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाच रुपयाला एक लिंबू याप्रमाणे विक्री होवू लागली आहे. श्रावणात 10 रुपयाला 5 लिंबू विकले जात होते. मात्र आता तोच लिंबू 5 रुपयाला एक झाला आहे.
यंदा पावसाअभावी नवीन भाजीपाला लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढण्याची भीती व्यक्त होवू लागली आहे. नवीन भाजीपाला लागवड झाली नाही. त्यामुळे आवकही कमी होणार आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडणार आहेत. सद्य परिस्थितीत भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असले तरी येत्या काळात भाजीपाला महागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
श्रावण आणि गणेशोत्सवात भाजीपाल्याची मागणी वाढली होती. मात्र आता गणेशोत्सव संपताच खवय्यांनी मांसाहाराला पसंती दिली आहे. त्यामुळे भाजीपाला मागणीही कमी होवू लागली आहे.









