सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून विविध कार्यक्रम, विसर्जन वेळेत करण्यासाठी आदल्या दिवशीच श्रीफळ सवाल
खानापूर : खानापूर शहर परिसरात गेले दहा दिवस गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करण्यात आला. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. गेल्या दहा दिवसात अत्यंत उत्साहीत असलेल्या गणेशभक्तांनी अखेर गुरुवारी गणरायाला भक्तीपूर्ण वातावरणात निरोप दिला. गुरुवारी सकाळपासूनच मलप्रभा नदीकाठावर घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू झाले. शहरात विविध भागातून घरगुती गणपती डोक्यावरून, चारचाकी वाहनातून आणण्यात येत होत्या. फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषणा देत गणपती विसर्जनासाठी मलप्रभा नदीघाटावर पोहचल्या. घाटावरही फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. शेवटची पूजा विधी आणि आरती केल्यानंतर गणपतींचे विसर्जन करण्यात येत होते. घरगुती गणपतीचे विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जनासाठी नगरपंचायतीने खास व्यवस्था केली होती. घाटावर प्रकाश योजना तसेच मोठ्या गणपतीसाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात आली होती. नगरपंचायतीचे कर्मचारी आणि बचाव पथकही तैनात करण्यात आले होते.
शहरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणूक वेळेत सुरू व्हावी, या उद्देशाने श्रीफळ सवाल आदल्या दिवशीच केले होते. रात्री 8 पासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील विविध मार्गावर गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीचे भव्य स्वागत करण्यात आले. गणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी राजा छत्रपती चौक ते बेंद्रे खुटपर्यंत आबालवृद्धानी मोठी गर्दी केली होती. गणपती बाप्पा मोरय्या.. पुढच्या वर्षी लवकर या.. घोषणानी आणि फटाक्यांची आतषबाजी तसेच डिजेच्या गाण्याच्या तालावर तरुणाईने ठेका धरत नाचत तल्लीन झाले होते. डिजेच्या आवाजाने सारे खानापूर शहरच दणाणून गेले होते.
नंदगडसह ग्रामीण भागात गणेश विसर्जन
नंदगडसह खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात सार्वजनिक गणपतीसह घरगुती गणपतीचे नदी, तलाव व विहिरीत विसर्जन करण्यात आले. काही ठिकाणी तर आपल्या लाडक्मया बाप्पाला निरोप देण्यासाठी गावच एकवटला होता. सर्वत्र ढोल ताशाचा गजर, गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वषी लवकर या, असा जयघोष करत मोठ्या संख्येने भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते.
झाडनावगा येथे सामूहिक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन
झाडनावगा येथे घरोघरी पूजनात येणाऱ्या घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन सामूहिकरीत्या केले जाते. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अनंतचतुर्द शीदिवशी आपापल्या घरी गणपतीची पूजा केली जाते. गणपती मूर्ती प्राथमिक शाळेजवळ आणतात. त्यानंतर तिथून पुढे तलावाच्या बांधावर गणेशमूर्ती ठेवल्या जातात. यानंतर येथे पूजा व आरती करून गणपतीचे विसर्जन पेले जाते. नंदगड येथे गेली 80 वर्षे एक गाव एक गणपतीची परंपरा अखंडितपणे सुरू आहे. बाजारपेठेतील भव्य मंडपात गणपतीची मूर्ती बसवण्यात येते. गणेशोत्सव काळात तर रोज विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात. अनंतचतुर्दशीदिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीत येथील कमल तलावात रात्री उशिरा वाजतगाजत मिरवणुकीने सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केले गेले.









