अरविंद केजरीवाल यांची ग्वाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्ष विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ युतीसाठी वचनबद्ध असून त्यापासून दूर जाणार नाही, असे पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातून ‘इंडिया’ आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांमध्ये कोणतेही वाद होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार असल्याचे सांगितले.
‘इंडिया’ आघाडीशी आप नेहमी संलग्न राहील. आम्ही युतीचा धर्म पूर्णपणे पाळू, असे पक्षाचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पंजाबचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना 2015 मध्ये ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पंजाब काँग्रेस राज्यातील आप सरकारवर राजकीय सूड उगवल्याचा आरोप करत आहे. त्यानंतर केजरीवाल यांनी सदर स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेसने केलेले आरोप ‘आप’ने फेटाळून लावले असून खैरा यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील काँग्रेस आमदाराच्या अटकेनंतर ‘इंडिया’ आघाडीचे भविष्य काय असेल, असा प्रश्न केजरीवाल यांना विचारण्यात आला होता. खैरा यांच्या अटकेसंबंधी माझ्याकडे सविस्तर तपशील नाही. यासंबंधी तुम्ही पंजाब पोलिसांशी बोलायला हवे, असेही ते पुढे म्हणाले. पंजाबचे भगवंत मान सरकार राज्यातील अमली पदार्थांची समस्या संपवण्यासाठी कटिबद्ध आहे. अमली पदार्थांमुळे तऊणाचे जीवनमान उद्ध्वस्त होत आहे. परिणामत: प्रभावशाली व्यक्ती असो वा नीच व्यक्ती, कोणालाही माफ केले जाणार नाही. मी कोणत्याही विशिष्ट घटनेवर भाष्य करत नाही, असेही ते पुढे म्हणाले.









