भारतीय सूत्रांकडून कारस्थानाचा गौप्यस्फोट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या भारत सरकारच्या हस्तकांनी नव्हे, तर पाकिस्ताची गुप्तहेर संस्था आयएसआयने घडविली आहे. भारत आणि कॅनडा तसेच पाश्चिमात्य देश यांच्या बळकट होत चाललेल्या संबंधांना बाधा पोहचविण्यासाठी हे कारस्थान करण्यात आले, असा गौप्यस्फोट भारतीय गुप्तचरांच्या सूत्रांनी केला आहे. त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. या दिशेने तपास होण्याची आवश्यकता तज्ञांनी व्यक्त केली आहे.
आयएसआय या संघटनेने भाडोत्री गुन्हेगार आणि गुंड यांच्या साहाय्याने ही हत्या घडविली. निज्जर याच्यावर आयएसआयने दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन वर्षांमध्ये कॅनडात आयएसआयने अनेक गुंड आणि गुन्हेगार घुसविले आहेत. या गुन्हेगारांना निज्जर याने समर्थन द्यावे, असे आयएसआयचे म्हणणे होते. तथापि, निज्जर याचा पाठिंबा खलिस्तानची मागणी करणाऱ्या जुन्या नेत्यांना होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
भारतात हिंसाचार घडविण्याचा प्रयत्न
कॅनडातील जहाल खलिस्तानवादी गुंड आणि हिंसाचाऱ्यांच्या साहाय्याने भारताच्या पंजाब राज्यात पुन्हा हिंसाचार घडविण्याचा आयएसआयचा कट आहे. तो तडीस नेण्यासाठी या संघटनेने कॅनडातील खलिस्तानवादी संघटनांना हाताशी धरण्याचा प्रयत्न चालविला आहे. 1980 च्या दशकात पंजाब दहशतवादी हिंसाचाराच्या आगीत होरपळला होता. तशीच परिस्थिती तेथे पुन्हा निर्माण करुन भारताला अस्थिरतेच्या खाईत लोटण्याचे हे कारस्थान असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
निज्जरची हत्या योजनापूर्वक
निज्जरच्या हत्येसाठी आयएसआयने कॅनडातील गुंडाचा उपयोग केला. या गुंडांना शस्त्रे पुरविण्यात आली. त्यांना निज्जर याच्या हालचालींची माहितीही वेळोवेळी देण्यात आली. तो 18 जूनला कॅनडाच्या सरे शहराच्या एका गुरुद्वारातून बाहेर पडताच त्याचा पाठलाग करण्यात आला. तो ज्या वाहनातून प्रवास करीत होता, ते अडवून त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. त्याच्या अंगात 34 गोळ्या घुसल्याचे नंतर स्पष्ट झाले. ही गुन्हापद्धती आयएसआयचीच आहे. या घटनेचा व्हिडीओही संकलित करण्यात आला आहे. तो प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तो उघड झाल्यास हत्या कोणी केली आणि हत्येचे सूत्रधार कोण आहेत, हे स्पष्ट होऊन चौकशीला नेमकी दिशा मिळू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.









