शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची ग्वाही
सावंतवाडी : प्रतिनिधी
भेडले माड उन्मळून अंगावर पडुन मृत्युमुखी पडलेल्या राहुल पंदारे आणि समीर पंदारे यांच्या कुटुंबांना शासनामार्फत भरीव नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी सर्वपक्षीय बैठकीत दिली. येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात बैठक झाली .या बैठकीत आमदार वैभव नाईक, तहसिलदार श्रीधर पाटील, नायब तहसिलदार मुसळे, वीज वितरणचे अधिकारी उपस्थित होते. राजवाडा परिसरात आंजिवडे येथील राहुल पंदारे आणि समीर पंदारे या दोघा युवकावर मंगळवारी रात्री अकरा वाजता गोठण परिसरात भजन करून आंजिवडे येथे परतत असताना भेडले माडाचे झाड उन्मळून पडले. त्यात दोघेही जागीच ठार झाले .या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्ते संतप्त झाले .त्यांनी पालिका मुख्याधिकारी सागर साळुंखे नायब तहसिलदार मुसळे, वीज वितरणचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली .या बैठकीत सर्वपक्षीय कार्यकर्ते ,पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी सागर साळुंखे तसेच वीज वितरणचे अधिकारी यांना धारेवर धरले . झाडे जीर्ण झाली असताना ती तोडण्यात आली नाहीत. त्यामुळे याला पालिका प्रशासन जबाबदार असून शहरात अनेक ठिकाणी अशी जीर्ण झाडे आहेत ती तोडण्यात यावीत अशी मागणी केली. तर वीज वितरण कंपनीमुळे अनेक जणांना नाहक जीव गमवावा लागत आहे. यापूर्वी अशा घटना शहरात घडल्या .जुना बाजार येथे विजेची तार पडून दोघेजण ठार झाले होते .तर ओटवणे येथे एक मुलगा विजेची तार कोसळून मृत्युमुखी पडला होता. वीज वितरणाच्या बेदाबदारपणामुळे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे या घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार असून मंगळवारी घडलेलया घटनेलाही वीज वितरण कंपनी जबाबदार आहे .झाड पडल्यानंतर तत्काळ वीज पुरवठा खंडित झाला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. दोघा युवकांच्या कुटुंबीयांना वीज वितरणने तसेच शासनाने पुरेशी नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली .जोपर्यंत भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतले जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला. सुमारे अडीच तासाहून अधिक काळ नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पालिकेत बैठक असल्याची माहिती मिळताच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर तत्काळ उपस्थित झाले. त्यांनी घटनेबाबत दुःख व्यक्त केले. आपण दोघा कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे .मी माझे सर्व कार्यक्रम रद्द केले .घटनेचे पंचनामे व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत .या दोघा युवकांच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेतून तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही त्यांनी दिली .आपण याबाबत स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्यातर्फेही या कुटुंबीयांना मदत केली जाणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनानंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते शांत झाले .त्यांनी केसरकर यांच्या आश्वासनानुसार मृतदेह ताब्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले .यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष समीर वंजारी ,भाजपाचे आनंद नेवगी, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, ठाकरे सेनेचे रुपेश राऊळ माजी नगरसेवक राजू बेग, उमाकांत वारंग, नासिर शेख, समृद्धी विरनोडकर तसेच तारकेश सावंत ,एडवोकेट नीलिमा गावडे ,माजी पंचायत समिती सदस्य सौ केळुस्कर आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते ,पदाधिकारी ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .सौ केळुस्कर यांनी हे दोन्ही युवक गवळी समाजाचे आहेत. त्यांचे कुटुंबीय गरीब आहे .त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून त्यांना भरपाई मिळावी अशी मागणी केसरकर यांच्याकडे केली .केसरकर यांनी भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले .मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.