गणेशभक्तांबरोबर शेतकरी वर्गातूनही समाधान : नदी प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द किर्यात परिसरातील घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती मार्कंडेय नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला कंग्राळी खुर्द ग्रा. पं. व गणेशभक्तांकडून मार्कंडेय नदीवरील अलतगा फाटा जवळील बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवून दिलासा देण्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची त्वरित दखल घेऊन अलतगा फाट्याजवळील बंधाऱ्यावर फळ्या घालून पाणी अडविल्यामुळे गणेशभक्तांबरोबर शेतकरी वर्गातूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवार दि. 28 रोजी अनंत चतुर्दशी असल्यामुळे मार्कंडेय नदीवरील अलतगा फाट्याजवळील बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविणे फार गरजेचे होते. प्रत्येकवर्षी गणेश चतुर्थीपूर्वीच सदर बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविले जात होते. परंतु यावर्षी गेले महिनाभर पावसाने हुलकावणी देऊनसुद्धा मार्कंडेय नदीकाठ भात व ऊसपिक शिवार ओलिताखाली आणण्यासाठी सदर बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविण्यासंदर्भात ‘तरुण भारत’मधून अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊनसुद्धा पाटबंधारे खाते दुर्लक्ष करत होते. परंतु गेल्या दोन दिवसापूर्वी सदर बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविल्यामुळे अलतगा फाटा बंधारा व कंग्राळी खुर्द जवळील जुना पूल या दोन्ही ठिकाणी पाणी साठल्यामुळे शेतकरी वर्गाबरोबर कंग्राळी खुर्द किर्यात परिसरातील गणेशभक्तांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मार्कंडेय नदीमध्ये साठविलेल्या पाण्यामध्ये कंग्राळी खुर्द, अलतगा, कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर, मार्कंडेयनगर, नेहरूनगरबरोबर बेळगाव शहरातील अनेक गल्यांतील गणेशभक्त घरगुती गणेशमूर्तीबरोबर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणतात. यामुळे या सर्व भक्तांची सदर बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविल्यामुळे विसर्जनाची चिंता मिटली असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कंग्राळी खुर्द ग्रा. पं. ची चोख व्यवस्था
सध्या मार्कंडेय नदीमध्ये साठवलेल्या पाण्यामध्ये दीड दिवस, पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कंग्राळी खुर्द जवळील जुना पूल परिसर व अलतगा फाटा मार्कंडेय नदीकाठावर नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ केलेला आहे. तसेच अनंतचतुर्दशी दिवशी रात्री उशिरा गणेशमूर्तींचे विसर्जन सुरूच राहणार म्हणून दोन्ही ठिकाणी स्ट्रीट लाईट लावून मोठ्या प्रकाशाची सोय केली आहे. तसेच भाविकांनी निर्माल्य नदीपात्रामध्ये न टाकता नदीकाठावर एका ठिकाणी जमा करून मार्कंडेय नदी प्रदूषण होण्यापासून वाचण्यास सहकार्य करण्याचेही आवाहन केले आहे.









