बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त शहरात मंगळवारी विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणहोम, महाआरती आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शहापूर-खडेबाजार येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यंदा या मंडळाचे शतकमहोत्सवी वर्ष असल्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. रविवारपेठ येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा या मंडळाचे 117 वे वर्ष असल्याने धार्मिक कार्यक्रम पार पडले. अध्यक्ष शंकर अथणीमठ, अतुल गुंडकल, पी. के. पटेल यासह पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. बसवेश्वर सर्कल, खासबाग येथील व्यापारी बंधू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी गणहोम आणि सत्यनारायण पूजा झाली. यंदा या मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने मंडळाचे पदाधिकारी रोज विविध धार्मिक कार्यक्रम राबवत आहेत. अध्यक्ष दिनेश मेलगे, उपाध्यक्ष सुनील कलाल, कार्याध्यक्ष संतोष कणुकले, सचिव विनोद कोळीवाड, उपसचिव महेश शिंदे, खजिनदार सुभाष शिनोळकर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुनगर येथे महाप्रसाद
बेळगाव : हिंदुनगर, राणा प्रताप रोडवरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंगळवारी गणहोम आणि महाप्रसाद पार पडला. गणहोमचे यजमानपद अध्यक्ष विनायक देसाई यांनी स्वीकारले. दुपारी महाप्रसादाला परिसरातील नागरिक उपस्थित होते. अंदाजे अडीच हजारांहून अधिकांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. या मंडळाचे वैशिष्ट्या म्हणजे सलग तीन दिवस हे मंडळ प्रसाद वितरण करताना एक दिवस झुणका भाकरी व एक दिवस दूध वाटप करते. झुणका भाकरीसाठी या परिसरातील महिला स्वत: स्वेच्छेने भाकरी करण्याचे काम स्वीकारतात. महाप्रसादादिवशी खीर, भात व भाजी जरी पुरुषवर्ग करत असला तरी याच महिला महाप्रसादाला सुरुवात झाल्यापासून शेवटपर्यंत चपाती लाटण्याचे काम करतात. त्यामुळे या मंडळाची परिसरात नेहमीच कौतुकाने चर्चा होते.









