येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटमधील महायुद्धाला अर्थात वर्ल्डकपला सुऊवात होत असून, या स्पर्धेकरिता भारतीय संघ पूर्ण ताकदीनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. 1983 मध्ये वेस्ट इंडिजला धूळ चारत कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक करंडकावर सर्वप्रथम आपले नाव कोरले. त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियाने या इतिहासाची पुनरावृत्ती केली. तेव्हापासून प्रत्येक स्पर्धेत भारतीय संघ हा विजेतेपदाचा दावेदार मानला जातो. आजमितीला रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व असून, मजबूत व समतोल संघ पाहता भारताकडे विश्वकरंडक उंचावण्याची निश्चितच संधी असेल. आशिया कपमधील दमदार अजिंक्यपदानंतर ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघावर भारताने मिळविलेला मालिका विजय पाहता टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी सज्ज असल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे मोक्याच्या क्षणी सर्वच खेळाडूंना फॉर्म गवसल्याने भारताचे पारडे जड मानायला हरकत नसावी. धडाकेबाज सलामीवीर शुभमन गील याच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा असतील. शुभमन सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून, मागच्या काही दिवसांत त्याने नवनवीन विक्रमांची नोंद केल्याचे दिसते. 2023 या वर्षांत त्याने 20 सामन्यात आत्तापर्यंत 1230 धावांचा रतीब घातला असून, त्याची सरासरी तब्बल 70 टक्क्यांहून अधिक राहिली आहे. चार शतके, एक द्विशतक फटकावत आपला झंझावात दाखवून देणारा हा शैलीदार फलंदाज वर्ल्ड कप गाजवणार का, याकडे समस्त क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. मागच्या काही दिवसांपासून फॉर्मसाठी झगडणाऱ्या रोहित शर्मानेही आशिया कपमध्ये नेतृत्व व फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर आपला दर्जा सिद्ध केल्याचे पहायला मिळते. मुळात रोहित हा मॅचविनर खेळाडू आहे. सेट झाल्यानंतर त्याला रोखणे कठीण असते. फलंदाज म्हणून महत्त्वाच्या स्पर्धेत तो कसे प्रदर्शन करणार, याची सर्वांना उत्सुकता राहील. कोणत्याही संघाच्या यशात कल्पक नेतृत्वाचाही वाटा मोठा असतो. खेळपट्टी, वातावरण व परिस्थिती पाहून मैदानात कधी कुणाला फलंदाजी वा गोलंदाजीकरिता उतरवायचे, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी करायची, हे अतिशय महत्त्वाचे असते. स्वाभाविकच धोनीच्या संघात तयार झालेल्या रोहितकडून या स्तरावरही अपेक्षा राहतील. विराट कोहली हे भारताचे खणखणीत नाणे समजले जाते. त्याच्या भात्यात सर्वप्रकारची अस्त्रे अर्थात शॉट्स आहेत. गोलंदाज द्रुतगती असो वा फिरकी. विराटची बॅट चालली, की भलेभले नेस्तनाबूत होतात. आशिया कपमध्ये त्याने पाकिस्तानविरूद्ध तडकावलेल्या 122 धावा तो किती विराट खेळ करू शकतो, हेच सांगतात. के. एल. राहुलने आशिया कप व ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत जोरदार प्रदर्शन करीत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शुभमन, विराटप्रमाणे राहुलच्या खेळालाही एक लय, शैली आहे. पाकविऊद्धच्या सामन्यात त्याने ठसठशीतपणे आपले हे वेगळेपण अधोरेखित केले. आता वर्ल्ड कपमध्ये तो कशी कामगिरी करतो, हे पहायचे. दुखापतीमुळे श्रेयस अय्यरबाबत जर तरची स्थिती होती. परंतु, ऑस्ट्रेलियाविरूद्ध दणदणीत शतक झळकावत त्याने चवथ्या क्रमांकासाठी अजूनही आपण प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय फलंदाजी अधिक सखोल बनली आहे. सूर्यकुमार यादवला मागच्या काही सामन्यांमध्ये धावांसाठी झगडावे लागले. मात्र, वर्ल्ड कपपूर्व सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाजी करीत त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. डावखुऱ्या इशान किशननेही फलंदाजी, यष्टीरक्षणात चमक दाखविली आहे. एकेकाळी द्रुतगती गोलंदाजीत भारतीय संघ दुबळा म्हणून ओळखला जात असे. आज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व प्रसिद्ध कृष्णा अशी आघाडीची फळी आपल्याकडे आहे. सिराज, शमी, बुमराहशी दोन हात करणे, कोणत्याही संघाकरिता सोपी बाब नसेल. फिरकीत रवींद्र जडेजा, अश्वीन, अक्षर पटेल, कुलदीप यादव असे अनुभवी व प्रभावी गोलंदाज दिमतीला आहेत. याशिवाय हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकुरसारखे अष्टपैलूही संघात आहे. संघाची अशी तगडी फौज असल्याने अंतिम संघात कुणाला खेळवायचे, हे निश्चित करताना संघ धुरिणांचा कस लागेल. यंदाच्या विश्वकरंडक संघात भारत घरच्या मैदानावर खेळत आहे. संघासाठी ही जमेची बाजू ठरावी. स्वाभाविकच बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी भारतीय संघाला नमविणे कठीण असेल, हा व्यक्त केलेला विश्वास रास्तच म्हणता येईल. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यानेही भारताला जो हरवू शकेल, त्याला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी असेल, असे म्हटले आहे. एकूणच भारतीय संघ नक्कीच फेव्हरिट ठरतो. तरीही आशिया कप स्पर्धेत बांग्लादेशसारख्या देशाकडून झालेला पराभव पाहता गाफील राहून चालणार नाही. छोट्या छोट्या चुका टाळताना क्षेत्ररक्षणातही चलाखी दाखवावी लागेल. क्रिकेटचे वातावरण तयार होत असतानाच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेटपटूंसह अन्य खेळाडूंनी केलेली कामगिरी नजरेत भरणारी ठरते. महिला क्रिकेटपटूंनी अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करीत पटकावलेले सुवर्णपदक विशेष म्हटले पाहिजे. याशिवाय रोईंग, नेमबाजीसह वेगवेगळ्या स्पर्धा प्रकारांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद म्हटली पाहिजे. पदकतालिकेत सध्या चीन अग्रक्रमावर असून, भारत पाचव्या-सहाव्या स्थानावर असल्याचे दिसत आहे. भारताने दोन आकडी संख्या गाठली असून, या स्पर्धेतील कामगिरीही समाधानकारक म्हणता येईल. कोणत्याही देशाची आर्थिक किंवा अन्य आघाड्यांवरील प्रगती महत्त्वाचीच. तथापि, क्रीडा क्षेत्रात संबंधित देश कोणत्या स्तरावर आहे, हेही महत्त्वाचे होय. काही वर्षांपासून ऑलिंपिकमध्येही भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत, असो. तुर्तास वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाला शुभेच्छा!








