क्रिसिल संस्थेने वर्तवला अंदाज : 440 दशलक्ष टन मागणी राहणार
वृत्तसंस्था/ कोलकाता
बांधकाम क्षेत्रासह पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये होत असलेल्या विविध हालचालींचा विचार करता चालू आर्थिक वर्षामध्ये सिमेंटच्या मागणीमध्ये 10 ते 12 टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदरचा मागणीसंदर्भातला अंदाज क्रिसिल या संस्थेने व्यक्त केला आहे. सदरची वाढीव मागणी ही वर्षाच्या आधारावर नोंदली जाणार आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये सिमेंटची मागणी 440 दशलक्ष टन इतकी राहील, असे म्हटले जात आहे.
पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे तसेच बांधकाम क्षेत्रातल्या हालचालींमुळे ही मागणी वाढीव राहणार असल्याचे स्पष्टीकरण क्रिसिलने दिले आहे. सिमेंटच्या किमतीदेखील स्थिर आहेत. भारत सरकारच्या विविध पायाभूत सुविधांच्या उपक्रमांसाठी सिमेंटचा वापर हा 30 टक्के इतका दिसून आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधांसाठी यंदा वाढीव तरतूद केल्यामुळे सिमेंटची मागणी आगामी काळात वाढणार आहे.
गृहबांधणी उद्योगात अधिक मागणी
गृहबांधणी प्रकल्पांचा विचार करता सिमेंटच्या मागणीचा वाटा हा 55 टक्के इतका असून त्यामध्ये आगामी काळामध्ये वाढ होण्याची शक्यता सांगितली जात आहे. अफोर्डेबल हाऊसिंगकरिता सरकारने दिलेल्या प्रोत्साहनामुळे सिमेंटची मागणी वाढीव दिसून आली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सामान्यांच्या घराचे स्वप्न साकार केले जात आहे. आर्थिक वर्षाच्या पुढच्या सहा महिन्यांमध्ये सिमेंटची मागणी 7 ते 9 टक्के इतकी वाढीव राहणार असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.









