काही दिवसापुर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देऊन तुम्ही वरळीतून निवडणूक लढा नाही तर मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे म्हटले होते. आदित्य ठाकरे ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर ठाण्यातून आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीच्या चर्चां रंगू लागल्या. तसेच आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, वंचित आघाडी आणि शिवसेना- ठाकरे गट यांची युती असल्याने आदित्य ठाकरे ठाण्यातून उभे राहिले तर त्यांच्या प्रचाराला मी स्वत: जाणार असल्याचे म्हटले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत आम्ही एकत्र असलो तर तसेच आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणूक ठाण्यातून लढवली तर मी स्वत: त्यांच्या प्रचाराला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी मी युतीधर्म पाळणार. मी राजकिय दृष्ट्या स्पष्ट आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा अदानींसोबत नरोबा, कुंजोबा सुरु आहे तसं आमचं नाही.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले “1 सप्टेंबर रोजी वंचित आघाडीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी पत्र लिहिलं होतं. तसेच ईमेल देखील केला होता. पत्रात आम्ही आम्हाला इंडिया आघाडीत सहभागी व्हायचं असल्याचे स्पष्ट म्हटले होते. तसेच ज्याज्या अटी असतील त्यावर आम्ही बोलणी करण्यास तयार आहे. मात्र आजपर्यंत काँग्रेसकडून पत्राला कोणतंही उत्तर आले नाही.” अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.