गावणवाडा-माशेल येथील रवळनाथ मंदिराचा गणेशोत्सव भगत कुटुंबियांचा पत्रीचा गणपती म्हणून प्रसिद्ध
प्रेमानंद शिरोडकर/माशेल
गावणवाडा-माशेल येथील रवळनाथ मंदिराचे भगत कुटूंबियांचा दीड दिवसाचा ‘पत्रीचा गणपती’ म्हणून असलेली परंपरा आज सुमारे अडीचशे वर्षापासून अखंडीतपणे सुरू आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी रवळनाथ मंदिरातील लक्ष्मी रवळनाथाला चोहोबाजूंनी पत्री (शरवडा)ची पाने चिकटवून ‘लक्ष्मी रवळनाथ’ चे दीड दिवस ‘श्री गणेश’ म्हणून पुजन केले जाते. अशा आगळ्यावेगळया तऱ्हेने भगत कुटूंबियांतर्फे गणेश चतुर्थी सण मोठ्या उमेदीने साजरा करीत आहे. प्राप्त माहितीनुसार गावणवाडा माशेल येथील रवळनाथ मंदिरात पुजा करणारे भगत कुटूंबिय यांच्या घरी गणपती पूजन होत नाही. शेकडो वर्षाची परंपरा आजही चालू आहे. त्याचा देव रवळनाथ असून त्याच मंदिरातील लक्ष्मी रवळनाथाची ते पुजा करीत आहे. चतुर्थीच्या दिवशी सदर भगत कुटूंब मंदिरातील रवळनाथाच्या मुर्तीला आपला गणपती मानून त्याची दीड दिवस सेवा करतात. पत्रीचा गणपती म्हणजे चतुर्थीच्या दिवशी पत्रीसाठी वापरण्यात येणारी पाने (शरवडा) रवळनाथाच्या मुर्तीला चिकवटतात व इतर पत्रीची फुलेही रवळनाथाला अर्थातच गणपतीला वाहतात. चतुर्थीच्या दिवशी पुजा करतेवेळी ही शरवडा चिकटवली जातात.
चतुर्थी घरातल्याप्रमामणे फक्त घुमटाऐवजी जगटा वाद्य
प्रत्येकाच्या घरात ज्या पद्धतीने विविध फळांची तसेच रानफळांची आंब्याच्या ताळयाची माटोळी बांधली जातात. तशीच माटोळी भगत कुटूंबियाच्या प्रत्येक सदस्याकडून बांधली जाते. दुपारच्यावेळी मोदक व इतर पंचपक्वानांचा नैवेद्यही दाखवला जातो. आरतीच्यावेळी घुमटाच्या ऐवजी जगटा वाद्य वाजविले जाते. प्रत्येक भगत कुटूंबिय आपल्यापरीने नैवेद्य देवाला दाखवतात. दीड दिवसानंतर साडेसात ते आठच्या दरम्यान उत्तरपूजा केली जाते. उत्तरपूजा झाल्यावर रवळनाथाच्या मुर्तीला चिकटवलेली शरवडा काढली जाते. जगाट वाद्य वाजवून मंगलमुर्ती मोरयाच्या घोषणेने गणपती अर्थात पत्रीच्या विसर्जन केले जाते.
नोकरीनिमित्त किंवा इतर कामासाठी बाहेर असलेले भगत कुटूंब दरवर्षी दोन दिवस चतुर्थीला आपल्या घरी येऊन रवळनाथाच्या मंदिरात आपली चतुर्थी त्याच उत्साहात साजरी करतात. भगत कुटूंबाचा मंदिरातील गणपती फक्त दीड दिवसाचा असतो. दुसऱ्या दिवसापासून मंदिरातील कामकाज पुर्वीप्रमाणे सुरू होते. भगत कुटूंबियाची ही शेकडो वर्षाची पारंपारिक पद्धतीने चालू असल्याचे कुटूंबातील ज्येष्ठ नारायण भगत यांनी सांगितले.









