अद्याप जुलैचाही निधी नाही, लाभार्थी नाराज, हेल्पलाईनची गरज
बेळगाव : सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली आहे. शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी आणि अन्नभाग्य योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र मागील दोन महिन्यांत काही लाभार्थ्यांना अन्नभाग्य योजनेचा निधी मिळाला नाही. याबाबत अन्न व नागरी पुरवठा खाते किंवा बँकेत चौकशी केली असता डीबीटी व इतर समस्यांचे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अन्नभाग्यपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने बेळगाव जिल्ह्यासाठी 58 कोटींची तरतूद केली होती. मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या निधीपासूनही काही लाभार्थ्यांना वंचित रहावे लागले आहे. सरकारने सर्व लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्यापही बरेच लाभार्थी या योजनांपासून वंचित राहिले आहेत. काही लाभार्थ्यांचा जुलैचा निधी मिळाला आहे. मात्र ऑगस्ट महिन्याचा निधी जमा झाला नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होवू लागला आहे. याबाबत कोणाकडे चौकशी करावी? असा प्रश्नही लाभार्थ्यांसमोर पडला आहे. तर काही लाभार्थ्यांची रितसर नोंदणी होवून देखील अद्याप अन्नभाग्यचा लाभच मिळाला नाही. केवळ मासिक रेशनवर समाधान मानावे लागत आहे.
समस्या मार्गी लावण्यासाठी हेल्पलाईन सुरू करा
अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. त्याबरोबर मासिक 5 किलो तांदूळ वितरित केले जात आहेत. सरकारकडे मुबलक रेशनचा साठा नसल्याने रेशनच्या बदल्यात रोख निधी दिला जात आहे. मात्र हा निधी काही लाभार्थ्यांना मिळत नसल्याचे सामोरे येवू लागले आहे. त्यामुळे वंचित लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. काही लाभार्थ्यांना रेशनकार्ड, आधारकार्ड आणि डीबीटी समस्येचे कारण सांगितले जात आहे. मात्र काही लाभार्थ्यांची रितसर नोंदणी कागदपत्रेदेखील सुरळीत असून लाभ मिळत नसल्याचे दिसत आहे. अन्न व नागरी पुरवठा खात्याने समस्या मार्गी लावण्यासाठी हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी होत आहे.









