तंत्रज्ञानाची जोड : वेळ-श्रमाची बचत : नवीन प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांत कुतूहल
बेळगाव : शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचे प्रयत्न करू लागले आहेत. सध्या शेती व्यवसायात आधुनिक यंत्रांच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही दिवसांपासून ड्रोन शेतीचा पर्याय समोर आला आहे. हंदिगनूर येथील उमेश चौगुले या शेतकऱ्याच्या शेतात ड्रोनच्या साहाय्याने किटकनाशकाची फवारणी केली आहे. या नवीन प्रयोगामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले. शिवाय ही अत्याधुनिक फवारणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. हंदिगनूर येथील काही शेतकऱ्यांनी ड्रोनच्या साहाय्याने किटकनाशकाची फवारणी करून वेळ आणि पैशाची देखील बचत होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. सद्य परिस्थितीत पावसाअभावी शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे शेती देखील हायटेक होऊ लागली आहे. या नवीन प्रयोगामुळे परिसरातही चर्चा सुरू झाली आहे. उमेश चौगुले यांच्या दोन एकर शेतात ड्रोन फवारणीचा प्रयोग करण्यात आला आहे. ऊस, सोयाबीन, भुईमूग आणि इतर पिकांवर फवारणी करण्यात आली आहे. या फवारणीसाठी केवळ पंधरा मिनिटांचा कालावधी लागला आहे. पाठीवर पंप घेऊन फवारणी करायची असेल तर दोन एकरासाठी सहा तासांचा कालावधी लागतो. मात्र, या ड्रोनद्वारे तेच काम केवळ 20 मिनिटांत होते. शिवाय औषध आणि खर्चाची देखील बचत होते. त्यामुळे शेतकरी ड्रोनच्या साहाय्याने किटकनाशकाची फवारणी करण्यासाठी पुढे येत आहेत.
जसजसे आधुनिकीकरण झाले तसतसा शेतीमध्ये बदल होऊ लागला आहे. आता शेतातील पिकांवर ड्रोनचा उपयोग करून औषध फवारणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. त्यामुळे कमी वेळेत आणि कमी खर्चात अधिक क्षेत्रात पिके फुलवणे शक्य होऊ लागले आहे. पिकाचे क्षेत्र मोठे असले तर अगदी कमी वेळेत ड्रोनद्वारे फवारणी करता येते. त्यामुळे शेतकऱ्यानी या ड्रोनविषयी अधिक माहिती जाणून घ्यावी. मजूर मिळत नाहीत, समाधानकारक पाऊस पडत नाही, सुरळीत वीजपुरवठा नाही अशा एक ना अनेक कारणामुळे शेतीव्यवसाय अडचणीत येऊ लागला आहे. मात्र, अशा परिस्थितीतही आधुनिक यंत्रांचा वापर करून शेती करणे सोयीस्कर होऊ लागले आहे. त्यामुळे विविध पिकांची शेती फुलवणे शक्य झाले आहे. खरीप हंगामात बटाटा, रताळी, सोयाबीन, भुईमूग, भात आदी पिकांची पेरणी व लागवड करण्यात आली आहे. मात्र, पिकांच्या उत्तम वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी किटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र, शेतीचे क्षेत्र अधिक असल्यास यासाठी कालावधी देखील अधिक लागतो आणि श्रम देखील जादा लागतात. अशावेळी ड्रोनच्या साहाय्याने किटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरू लागले आहे.
अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
शेती पिकांवर योग्य ती औषधांची फवारणी करण्यासाठी ड्रोनचा वापर उपयुक्त आहे. अधिक शेती असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते. शिवाय बांधावर थांबून सर्व शेतीत औषधाची फवारणी करता येते.
– आकाश कुट्रे (ड्रोनचालक)
सर्व पिकांमध्ये ड्रोनद्वारे फवारणी शक्य
चार एकर क्षेत्रामध्ये ड्रोनच्या साहाय्याने फवारणी केली आहे. ऊस, सोयाबीन, भात पिकात किटकनाशकाची फवारणी झाली आहे. यासाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ लागला आहे. त्यामुळे वेळ, श्रम आणि आर्थिक बचत देखील झाली आहे. सर्व पिकांमध्ये ड्रोनद्वारे फवारणी शक्य आहे.
– उमेश चौगुले (शेतकरी, हंदिगनूर)