वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम
शनिवारी येथे झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडने आयर्लंडचा 48 धावांनी पराभव केला. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता तर तिसरा आणि शेवटचा सामना ब्रिस्टॉल येथे मंगळवारी होणार आहे.
या दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 8 बाद 334 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने आयर्लंडला 286 धावात गुंडाळून हा सामना जिंकला. इंग्लंड संघातील फिरकी गोलंदाज रेहान अहमदने 54 धावात 4 गडी बाद केले. त्याचप्रमाणे इंग्लंडच्या डावात सलामीचा फलंदाज जॅक्सने 94 तर सॅम हेनने 89 धावा झोडपल्या होत्या.
आर्लंडच्या डावामध्ये कर्णधार पॉल स्टर्लिंग आणि बेलबिरेनी यांनी डावातील पहिल्या 4 षटकात 46 धावा जमवल्या होत्या. इंग्लंड संघात वनडे पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज पॉल स्क्रिमशॉने बेलबिरेनीला बाद केले. त्यानंतर मॅथ्यू पॉट्सने स्टर्लिंगचा त्रिफळा उडवला. आयर्लंड संघातील हॅरी टेक्टरने 40 चेंडूत 39 धावा जमवल्या. जॉर्ज डॉक्रेलने 43, जोस लिटलने 29 तर क्रेग यंगने नाबाद 40 धावा जमवल्या. लिटल आणि यंग यांनी शेवटच्या गड्यासाठी 55 धावांची भागीदारी केली. स्क्रिमशॉने लिटलला बाद करून आयर्लंडचे आव्हान संपुष्टात आणले.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकात 8 बाद 334 (जॅक्स 94, सॅम हेन 89), आयर्लंड सर्वबाद 286 (डॉक्रेल 43, टेक्टर 39, लिटल 29, व्रेग यंग नाबाद 40, रेहान अहमद 4-54).









