झारखंडमधील घटना : दरोडेखोरांकडून महिलांशी गैरवर्तन, 10 राऊंड गोळीबार
वृत्तसंस्था/ रांची
झारखंडमधील लातेहार आणि डालतेनगंज स्थानकांदरम्यान संबलपूर – जम्मू तावी एक्स्प्रेसमध्ये शनिवारी रात्री दरोडा पडला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लातेहार स्थानकात आठ दरोडेखोर रेल्वेमध्ये चढले. रेल्वेचा वेग वाढताच दरोडेखोरांनी हल्ला केला. सशस्त्र दरोडेखोरांनी रेल्वेच्या एस9 बोगीमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास धुडगूस घालताना महिला प्रवाशांशी गैरवर्तन केले. दरोड्यादरम्यान दरोडेखोरांनी 8-10 राऊंड गोळीबारही केला. अर्ध्या तासाहून अधिक वेळ लुटल्यानंतर दरोडेखोर साखळी खेचून फरार झाले.
ओडिशातील संबलपूरहून जम्मू तावीला जाणारी टेन झारखंडमध्ये असताना रात्रीची वेळ होती. रेल्वे लातेहार स्थानकावरून निघाल्यानंतर अचानक 10 जण स्लीपर कोच क्रमांक एस-9 मध्ये आले आणि प्रवाशांना लुटण्यास सुऊवात केली. महिलांशी गैरवर्तन करून त्यांचे दागिने हिसकावून घेतले. तसेच सर्व प्रवाशांचे मोबाईल फोन आणि पर्स हिसकावून घेतल्या. याशिवाय त्यांनी अनेक प्रवाशांना मारहाणही केली. यानंतर प्रवाशांना घाबरवण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबारही केला. त्यांनी सुमारे अर्धा तास बोगीमध्ये कहर सुरू ठेवल्यामुळे प्रवाशांनी भीतीने गाळण उडाली होती. झारखंडमधील लातेहार ते बरवाडीह स्थानकादरम्यान दरोडेखोरांनी ही घटना घडवली.
या घटनेदरम्यान रेल्वे पोलीस दलाचे जवान पुढील डब्यात उपस्थित होते, परंतु त्यांना या घटनेची माहितीही नव्हती. गाडी डाल्टनगंज स्थानकावर येताच प्रवाशांनी एकच गोंधळ घातला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी सुमारे 2 तास रेल्वे डाल्टनगंज स्थानकावर उभी राहिली. जखमींवर तेथे उपचार करण्यात आले.









