नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदा भारताला जी-20 परिषदेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. 31 नोव्हेंबरपर्यंत हे नेतृत्व भारताकडेच राहणार आहे. गेल्या साधारणत: 10 महिन्यांचा हा नेतृत्वकाळ अत्यंत आव्हानात्मक होता. सध्या जग उत्तर गोलार्ध विरुद्ध दक्षिण गोलार्ध अशा वादात सापडले आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम असा परंपरागत वादही अधिक धारदार झाला आहे. या वादांचा परिणाम जी-20 परिषदेवरही झाला. कारण या परिषदेत जगाच्या सर्व भूभागांचे प्रतिनिधित्व करणारे देश आहेत. या सर्व देशांमध्ये एकवाक्यता घडवून आणण्याचे मोठे आव्हान भारताने उत्तमरित्या पेलून दाखविले आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रव्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी न्यूयॉर्क येथे केले. येथे इंडिया-युएन अँड ग्लोबल साऊथ या विषयावरील एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात भाग घेण्यासाठी ते आले आहेत.
जगात सध्या विविध घडामोडींवरुन तणाव निर्माण झाले आहेत. जी-20 परिषदेचे ध्येय प्रमुखत: आर्थिक असले तरी जगाच्या सामाजिक स्थितीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, याची जाणीव परिषदेच्या प्रत्येक सदस्य देशाला आहे. कारण आर्थिक प्रगती साधायची असेल तर सामाजिक स्थितीही स्थिर असावी लागते, असा सिद्धांत आहे. भारताने आपल्या नेतृत्वकाळात याच दिशेने परिषदेला घेऊन जाण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.









