मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींचे आवाहन, 1 ऑक्टोबरला 1 तास सर्वांनी स्वच्छतेसाठी द्यावा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यंदा 2 ऑक्टोबरच्या गांधी जंयतीदिवशी सर्वांनी त्यांना ‘स्वच्छतांजली’ अर्पण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा 105 व्या आवृत्तीच्या भाषणात त्यांनी हे आवाहन केले. त्यांनी जी-20 परिषदेचे भारताची भारताच्या नेतृत्वातील कामगिरी आणि चांद्रयान-3 अभियानाचे देदिप्यमान यश यांचीही भलावण यावेळी केली.
आणखी काही दिवसांनी येणाऱ्या 1 ऑक्टोबरला सर्व देशवासियांनी सकाळी 10 वाजल्यापासून 1 तास स्वच्छतेसाठी द्यावा. स्वच्छतेसाठी श्रमदान करावे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आहे. त्यादिवशी सारा देश स्वच्छ दिसावा यासाठी सर्व देशबांधवांनी प्रयत्न करावेत. आपल्या घराचा परिसर, आपली गल्ली, मार्ग, बगीचे, नदी, सरोवर, पाणवठा इत्यादी सार्वजनिक स्थानी नागरीकांनी स्वच्छता करावी. ही गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, अशी सूचना त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांचा सहभाग
या स्वच्छता उपक्रमात स्थानिक स्वराज्य संस्था, अर्थात ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा इत्यादी संस्था सहभागी होणार आहेत. या संस्थांकडून स्वच्छता अभियानासाठी स्थाने निश्चित करण्यात येतील. या स्थानांची माहिती नागरीक पोर्टलवर देण्यात येईल. वेबसाईटवर उपलब्ध माध्यमांची निवड नागरीकांना करता येईल, अशी माहितीही देण्याता आली आहे.
जी-20 परिषदेत भारताचे नेतृत्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मन की बात कार्यक्रमात जी-20 परिषदेच्या यशासंबंधीही त्यांची मते व्यक्त केली. यावेळी या परिषदेचे नेतृत्व भारताकडे होते. शिखर परिषदही काही दिवसांपूर्वी भारतात झाली होती. या परिषदेत नेता म्हणून भारताला तारेवरची कसरत करावी लागली. युव्रेन युद्ध, दक्षिण गोलार्ध-उत्तर गोलार्ध वाद, पूर्व विरुद्ध पश्चिम असा वाद अशा अनेक वळणांमधून भारताच्या नेतृत्वात परिषदेने यशस्वीरित्या मार्गक्रमण केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
चांद्रयान-3 चे स्पृहणीय यश
चंद्राच्या दक्षिण ध्रूव प्रदेशात यान यशस्वीरित्या उतरविण्याचे भारताचे स्वप्न यावेळी पूर्ण झाले. या यशामुळे भारत आंतराळ संशोधन क्षेत्रात जणू महासत्तापदी पोहचला आहे. भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. भारताने मनात आणले तर तो कोणतेही जटील आव्हान पार करु शकतो, याची प्रचिती अशा अनेक घटनांमधून गेल्या काही वर्षांमध्ये आली आहे. परिणामी, भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी आता पालटली असून भारताचा सन्मान वाढला आहे, अशी भलावण त्यांनी केली.
पर्यटनाला प्रोत्साहन
जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतात 1 लाख विदेशी अतिथी आले होते. यामुळे जगाचे लक्ष भारताकडे वधले गेले असून भारतात पर्यटन व्यवसाय आणखी भरभराटीस येण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. शांतिनिकेतन आणि कर्नाटकातील होयसाळ मंदिरे यांना नुकतेचे युनेस्कोचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळाले आहे. या सर्व घडामोडींचा लाभ भारताच्या पर्यटन व्यवसायाच्या उत्कर्षासाठी मिळणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
प्राणी कल्याणाचे महत्व
प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करा, अशीही सूचना त्यांनी केली. लोक मंदिरांमध्ये जातात. पूजा करतात हे चांगलेच आहे. पण आपले देव ज्या वाहनांवर आरुढ आहेत त्या प्राणीरुपी वाहनांची ते चिंता करीत नाहीत. त्यांच्यासह सर्व प्राण्यांना संरक्षणाची आणि संवर्धनाची आवश्यकता असते. त्यामुळे प्राण्यांसंबंधी आपुलकी दाखविणे हा मानवतेचाच भाग असल्याचे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
छायाचित्र टाकण्याची सोय
जे नागरीक स्वच्छता या देशव्यापी स्वच्छता अभियानात समाविष्ट होतील त्यांना आपले स्वच्छता करीत असलेले छायाचित्र अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये सत्ताग्रहण केल्यानंतर त्वरित ‘स्वच्छ भारत अभियान’ या उपक्रमाचा प्रारंभ केला होता. या अभियानाला आता 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त या स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन आहे.
विविध विषयांना स्पर्श
ड मन की बातमध्ये स्वच्छतेसह विविध विषयांचा केला उहापोह
ड गांधीजींना स्वच्छतेच्या माध्यमातून आदरांजली देण्याची योजना
ड स्थानिक स्वराज्य संस्थांना या उपक्रमात सहभागी करुन घेणार
ड प्राणीमात्रांविषयी आपुलकी आणि सहानुभूती ठेवण्याचे आवाहन









