सकाळच्या नाश्त्यासाठी, रात्री हलकं- फुलकं काही खायचं असेल किंवा मुलांना डब्यात काही वेगळं पण पौष्टिक द्यायचं असेल, तर नक्की काय बनवायचं हा रोजचाच प्रश्न असतो, शिवाय तो पदार्थ पौष्टिक ही असायला हवा.आज आपण अशाच एका पौष्टिक पदाथाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
अर्धा कप मुगाची डाळ
१ कप गव्हाचं पीठ
१ कप ज्वारीचं पीठ
१ चमचा आलं- लसूण- मिरची पेस्ट
अर्धा चमचा तीळ
पाव चमचाओवा
पाव चमचा धने- जीरे पूड
एक बारीक चिरलेला कांदा,
कोथिंबीर
मीठ
तेल
कृती
थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम मुगाची डाळ स्वच्छ धुवून पाण्यात २ ते ३ तास भिजत घाला. यानंतर डाळ पाण्यातून बाहेर काढा आणि मिक्सरमध्ये टाकून जाडीभरडी वाटून घ्या. डाळीची अगदी बारीक पेस्ट करू नये. आता वाटून घेतलेली मुग डाळ, कणिक, ज्वारीचं पीठ आणि वरील सगळं साहित्य एका भांड्यात घ्या आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या.यामध्ये कांद्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही घालू शकता. तसेच थोडं लिंबूही पिळू शकता किंवा त्यामध्ये आमचूर पावडरही घालू शकता. आता पीठ मळून झालं की थालीपीठ एका कापडावर थापून घ्या. आणि तव्यावर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्या. खमंग- खुसखुशीत थालीपीठ तयार..