वाराणसी
चीनमधील हांगझाऊ येथे शनिवारपासून सुरू झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय क्रीडा पथकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
येथे शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचा कोनशीला समारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. या समारंभाला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शहा, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, कपील देव, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री उपस्थित होते. हे नवे स्टेडियम सुमारे 30 हजार प्रेक्षकांच्या क्षमतेचे राहणार असून सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या ठिकाणी दिवसरात्रीचे सामने खेळविले जाणार असल्याने प्रखर फ्लडलाईटस् सुविधा राहील.
या समारंभप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पथकाला शुभेच्छा दिल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत 655 सदस्यांचे भारतीय पथक सहभागी झाले असून भारतीय क्रीडापटू 41 क्रीडा प्रकारात आपला सहभाग दर्शवतील. भालाफेकधारक निरज चोप्रा, बॅडमिंटनपटू लवलिना बोर्गोहेन, मल्ल बजरंग पुनिया, महिला वेटलिफ्टर मीराबाई छानू, धावपटू ज्योती येराजी, अविनाश साबळे, मुरली श्रीशंकर यांच्याकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भुषविणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी नवी आकर्षक जर्सी उपलब्ध करून देण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर तसेच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वचषक स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या जर्सीवर ‘नमो’ असे लिहिले असून ही जर्सी पंतप्रधानांना भेट म्हणून देण्यात आली.