कसबा बीड,प्रतिनिधी
Ganesh Murti Visarjan Kolhapur 2023 : करवीर तालुक्यातील सावर्डे दुमाला या गावात गेली 29 वर्षे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली जात आहे. 1995 पासून एक गाव एक गणपती या परंपरेने करवीर तालुक्यात सावर्डे दुमालाने साऊंड सिस्टिम विरहीत एक वेगळेपण जपले आहे. गावात असणारे गट-तट ,पक्ष,गल्लोगल्ली असणारी मंडळे ,त्यांच्यात असणारी ईष्या या सर्वांना फाटा देत जय शिवराय व्यायाम तालीम मंडळाच्या संकल्पनेतून सुरुवात झाली.तेव्हापासून आत्तापर्यंत ही 29 वर्षाची परंपरा सावर्डे दुमाला या गावाने जपली आहे.
गणेश आगमनापासून गणेश विसर्जनापर्यंत संपूर्ण गाव एकत्रित येऊन या सार्वजनिक गणपतीची आरती करतात. भजन,झांज पथक ,धनगरी ढोल,मर्दानी खेळ अशा विविध वाद्यांचा वापर करत साऊंड सिस्टिम विरहीत यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.आज बाप्पाला निरोप देण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ चौकात जमले. यावेळी पालखीतून बाप्पाची मिरवणूक काढून सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी सावर्डे दुमालाचे गावचे सरपंच भगवान रोटे,उपसरपंच प्रकाश कदम ,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामसेवक शिवाजी वाडकर, गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी , सर्व सदस्य , विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते व सर्व संस्थेचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.