केरीच्या आनंद उपाध्ये यांची पर्यावरणपूरक चतुर्थी
फोंडा : गणपती हे निसर्गाचे प्रतिक असल्याने चतुर्थी सणाला सजावटही पर्यावरणपूरक असावी याकडे कलाकारांचा कल वाढत आहे. आर्ल, केरी-फोंडा येथील आनंद विनायक उपाध्ये यांनी गायीच्या शेणापासून शिवमंदिराची सुबक अशी प्रतिकृती उभाऊन त्यात गणपतीची पूजा बांधली आहे. शिवमंदिर, नंदी, तुळशी वृंदावन व दीपस्तंभ या सर्वच कलाकृती शेणापासून तयार करण्यात आल्या आहेत. वाहतूक खात्यात निरीक्षक असलेल्या आनंद उपाध्ये यांनी शेणापासून विविध कलाकृती साकारण्याचा अनोखा छंद जोपासला आहे. या छंदापोटीच यंदा चतुर्थी सणात घरातील गणपतीसाठी शेणापासून शिवमंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली. त्यासाठी घरी पाळलेल्या देशी गायींचे शेण व बांबू या दोनच गोष्टींचा त्यांनी मोठया कुशलतेने वापर केला आहे. शिवमंदिराच्या प्रतिकृतीसोबत गोव्यातील मंदिराचे वैशिष्ट्या असलेला दीपस्तंभ, तुळशी वृंदावन व त्यावर चैत्रांगण रेखाटण्यात आले आहे.
या सर्व कलाकृतींची तयारी त्यांनी मार्च महिन्यापासूच केली होती. शेण बऱ्यापैकी सुकून घट्ट होण्यासाठी कडक उन लागते. पावसाळ्यात ते शक्य नसल्याने त्यांनी मार्च ते मे असे तीन महिने त्यावर काम केले. उपाध्ये हे वाहतूक खात्याच्या काणकोण विभागात कामाला असल्याने शनिवार व रविवार तसेच अन्य सुट्टीच्या दिवसात त्यांनी या कलाकृतीवर अगदी मन तयार केल्या. शिवमंदिराच्या कलाकृतीसोबत त्यांनी चैत्रांगण तयार केले आहे. चैत्र महिन्यात हिंदू नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी घराच्या तुळशीवृंदावनासमोर हे चैत्रांगण रेखाटण्याची प्रथा आहे. त्यासाठी केन्व्हास पेपर व पंचाच्या कपड्यावर शेणाने सारवून अंगण तयार केले आहे. कुटुंबातील श्रृती व सुगंध उपाध्ये या मुलांनी गोपीचंदनचा वापर करुन विविध शुभचिन्हे त्यावर रेखाटली आहेत. गोव्यातील मंदिरांचे वैशिष्ट्या असलेला दीपस्तंभ, नंदी, बसण्याचा पाट या सर्व गोष्टी शेणापासून कलात्मकपणे तयार केल्या आहेत. त्यांच्या घरात पाच दिवस गणपती असल्याने कलाप्रेमींसाठी या काळात हा देखावा पाहायला मिळणार आहे.









