रस्त्याला उरला नाही कोणीच वाली
वार्ताहर / कुडाळ
गोवेरी-म्हारसेवाडी रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. पावसात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून डबकी तयार होत आहेत. यातूनच पादचारी नागरिक व वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारक व ग्रामस्थांमधून होत आहे.
गोवेरी – म्हारसेवाडी रस्ता चार- पाच किलोमीटर आहे. या परिसरात दीड हजारांच्या जवळपास लोकसंख्या आहे.सध्या या रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खडी वर आली आहे. त्यामुळे वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावरुन नेहमीच पादचारी, शाळकरी, वाहन धारकांची ये- जा सुरु असते. परंतु या रस्त्याची सध्या ठिकठिकाणी दुरावस्था झाली आहे. मोठ- मोठे खड्डे पडून खड्डयात पाणी साचून छोटी- मोठी डबकी तयार होत आहेत. संबंधित विभागाने या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढली आहेत. तसेच रस्त्यानजीक गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे रस्ता अजून खराब होण्याची शक्यता आहे. सध्या रस्त्यावरील खड्डयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहन धारकांना त्यांचा अंदाच येत नसल्याने या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या रस्त्याला वालीच कोणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.









