उत्कृष्ट खेळाडू स्टिफन डिसोझा, वेदांत चौगुले उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : युनायटेड गोवन्स रिक्रेशन संघटना आयोजित युनायटेड गोवन्स चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्ञानप्रबोधन संघाने सर्वोदय खानापूर संघाचा 2-0 असा पराभव करुन युनायटेड गोवन्स चषक पटकाविला. स्टिफन डिसोझा उत्कृष्ट खेळाडू तर वेदांत चौगुलेला उत्कृष्ट गोलरक्षकाने गौरविण्यात आले. सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सर्वोदय संघाने सेंट झेवियर्स संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करुन तर दुसऱ्या उपांत्यफेरीच्या सामन्यात ज्ञानप्रबोधन संघाने ज्योती सेंट्रल संघाचा 1-0 असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्याचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते दोन्ही संघाच्या खेळाडूंची ओळख करुन करण्यात आली. या सामन्यात 10 व्या मिनिटाला ज्ञानप्रबोधनच्या गंगाधर के.च्या पासवर अथर्व सातारडेकरने पहिला गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 45 व्या मिनिटाला अथर्व सातारडेकरच्या पासवर इशान चव्हानने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी ज्ञानप्रबोधनला मिळवून दिली. या सामन्यात सर्वोदय खानापूर संघाला गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागले पण त्यांना अपयश आले. शेवटी हा सामना ज्ञानप्रबोधनने जिंकला. सामन्यानंतर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते विजेत्या ज्ञानप्रबोधन व उपविजेत्या सर्वोदय खानापूर संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्टिफन डिसोझा (सर्वोदय), उत्कृष्ट गोलरक्षक वेदांत चौगुले (ज्ञानप्रबोधन), शिस्तबद्ध संघ ज्योती सेंट्रल स्कूल यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी फादर स्टिव्हन अलमेडा, संघटनेचे अध्यक्ष शंतनू पुसाळकर, इग्नेसेस मस्करन्स, प्रशांत हिरेमठ, विलियम मेनिजिस, सुनील कल्याणपूरकर, संपत तिगडी, जॉर्ज रॉड्रिग्ज, मॅन्यूल कारवालो, विजय रेडेकर, अभिषेक चेरेकर, रॉयस्टन जेम्स, रॉयन गोम्स आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून आमिन पिरजादे, विष्णू दावणेकर, बांधेकर, इम्रान बेपारी आदींनी काम पाहिले.









