चांद्रयान 3 : लँडर अन् रोव्हरला पुन्हा सक्रिय करणार इस्रो
वृत्तसंस्था /बेंगळूर
चांद्रयान-3 च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील लँडिंगनंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसाठी 22 सप्टेंबर हा दिवस अत्यंत खास ठरणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शुक्रवारी पुन्हा सूर्योदय होणार आहे. सूर्योदयामुळे इस्रो चांद्रयान-3 चा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरला पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करणार आहे. सूर्योदय पाहता इस्रोच्या वैज्ञानिकांनी देखील स्वत:ची पूर्ण तयारी केली आहे. चंद्राच्या शिवशक्ती पॉइंटवर सूर्योदय होण्यासह लँडर अन् रोव्हरला शुक्रवारी पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इस्रोला या प्रक्रियेत यश मिळाल्यास याला मोठी कामगिरी मानण्यात येणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अनेक ठिकाणी दर 15 दिवसांनी सूर्यप्रकाश पोहोचत असतो. ज्या ठिकाणी लँडर उतरला आहे, तेथे 15 दिवस सूर्यप्रकाश असतो, तर 15 दिवस अंधार असतो. शिवशक्ती पॉइंटवर (चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ज्या ठिकाणी लँडर उतरला होता ते स्थान) सूर्योदय झाल्यावर लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रिय होतील. इस्रोकडून लँडर अन् रोव्हर पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 22 सप्टेंबर रोजी दोन्ही उपकरणे सहजपणे चालू होतील अशी अपेक्षा असल्याचे वक्तव्य इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी केले आहे. इस्रोकडून मिळालेल्या माहितीनुसार विक्रम आणि प्रज्ञानमध्ये असलेल्या उपकरणांची बॅटरी अद्याप चार्ज आहे. ही बॅटरी सूर्यप्रकाशाद्वारे चार्ज होते. स्लीप मोडवर जाण्यापूर्वी लँडर आणि रोव्हरच्या बॅटऱ्यांना चार्ज करण्यात आले होते.









