ओंकारेश्वरमध्ये 108 फूट उंच पुतळा उभारला : अनेक किमीवरून होणार दर्शन
वृत्तसंस्था/ ओंकारेश्वर
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडून गुरुवारी ओंकारेश्वरमध्ये आदि शंकराचार्य यांच्या एका भव्य पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. हा विशाल आकाराचा पुतळा नर्मदी नदीच्या काठावरील सुरम्य मांधाता पर्वतावर उभारण्यात आला आहे. शंकराचार्य यांच्या या 108 फूट उंच पुतळ्याला ‘एकात्मतेची प्रतिमा’ असे नाव देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे यापूर्वी 18 सप्टेंबर रोजी या पुतळ्याचे अनावरण करणार होते. परंतु या भागात अतिवृष्टीची शक्यता पाहता हा कार्यक्रम 21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आदि शंकराचार्य यांचा हा पुतळा आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यास आणि मध्यप्रदेश राज्य पर्यटन विकास महमंडळाच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आला आहे.
शंकराचार्य यांचा जन्म केरळमध्ये झाला होता. संन्यास पत्करल्यावर शंकराचार्य हे ओंकारेश्वर येथे पोहोचले होते. ओंकारेश्वर येथे त्यांनी 4 वर्षांपर्यंत विद्यार्जन केले होते असे सांगण्यात येते. अद्वैत वेदांत दर्शन लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शंकराचार्य हे वयाच्या 12 व्या वर्षी ओंकारेश्वर येथून देशाच्या अन्य भागांमध्ये गेले होते. खंडवामध्ये नर्मदा नदीच्या काठावर ओंकारेश्वर हे मंदिरांचे शहर आहे. या शहरात 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर देखील आहे.









