काश्मीरचा मुद्दा केला उपस्थित : भारत-पाकने चर्चेद्वारे सोडवावा प्रश्न
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
तुर्कियेचे अध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. युएनजीएच्या 78 व्या सत्रात एर्दोगान यांनी दक्षिण आशियात शांतता, स्थैर्य आणि विकासासाठी काश्मीरमध्ये न्यायासोबत शांतता प्रस्थापित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी हा प्रश्न भारत आणि पाकिस्तानने चर्चा तसेच सहकार्याद्वारे सोडवावा असे नमूद केले आहे.
काश्मीरमध्ये शांततेसाठी जे पावले उचलली जातील त्याचे आम्ही समर्थन करू. भारत युएनएससीत एक महत्त्वाची भूमिका बजावत असून ही अभिमानाची बाब आहे. युएनएससीत अस्थारी सदस्यांना देखील स्थायी सदस्यत्व प्रदान करण्यात यावे. जग 5 देशांपेक्षा मोठे आहे. ही केवळ अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्सची गोष्ट नसल्याचे एर्दोगान यांनी म्हटले आहे.
तुर्किये सातत्याने काश्मीरवरून वादग्रस्त विधाने करत आहे. यापूर्वी मार्च महिन्यात युएनएचआरसीच्या बैठकीत एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रस्तावाद्वारे काश्मीर प्रश्न निकाली काढण्यात यावा असे म्हटले होते. यावर भारताने तुर्कियेला देशाच्या अंतर्गत विषयांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
तत्पूर्वी मागील युएनजीएच्या सत्रात तुर्कियेने काश्मीरवर वक्तव्य केले होते. काश्मीर प्रश्न 74 वर्षांपासून कायम आहे. दोन्ही बाजूंनी संयुक्त राष्ट्रसंघासोबत मिळून यावर तोडगा काढावा असे आमचे मानणे असल्याचे एर्दोगान यांनी मागील वर्षी म्हटले होते.
कलम 370 हद्दपार झाल्यावर…
2019 मध्ये काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आले होते, तेव्हा पाकिस्तानने या निर्णयाला विरोध दर्शविला होता. याप्रकरणी पाकिस्तानला तुर्कियेची साथ मिळाली होती. काश्मीर हा दक्षिण आशियासाठी अद्याप मोठा मुद्दा आहे. कलम 370 हटविण्यात आल्याने स्थिती अधिकच बिघडली असल्याची टिप्पणी तेव्हा एर्दोगान यांनी केली होती.









