महिलेने स्वत:च घालविली दृष्टीक्षमता
दिव्यांग लोकांच्या जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. काही लोक जन्मापासून दिव्यांग असतात, तर काही जण एखाद्या दुर्घटनेमुळे दिव्यांग होत असतात. परंतु कुणीही स्वत:हून दिव्यांगत्व इच्छित नाही. परंतु एका महिलेचे अंध होण्याचे स्वप्न होते. तिने स्वत:च्या हाताने स्वत:ला अंध केले आहे. ती लहानपणापासून एकच स्वप्नच पाहायची, स्वप्नात ती स्वत:ला एका अंध मुलगी म्हणून पाहत होती. याचमुळे या महिलेने स्वत:च्या डोळ्यांमध्ये ड्रेन क्लीनर टाकले, यामुळे तिची दृष्टीक्षमता गेली आहे.

ही महिला अमेरिकेच्या उत्तर कॅलिफोर्निया येथील असून तिचे नाव जेवेल शुपिंग आहे. तिचा जन्म एक तंदुरुस्त मुलीच्या स्वरुपात झाला होता, परंतु वयाच्या 21 व्या वर्षी तिच्या मनात अंध होण्याची इच्छा दाटून आली. याकरता तिने एका मनोचिकित्सकाकडे जात स्वत:चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डोळ्यांमध्ये ड्रेन क्लीनर टाकू शकते का अशी विचारणा केली होती. जेवेलने स्वत:च्या डोळ्यांमध्ये ड्रेन क्लीनर टाकले देखील. डॉक्टरांनी तिची दृष्टीक्षमता वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु आता ती काहीच पाहू शकत नाही.
आजार ठरणे कारण
जेवेलचे वय 38 वर्षे असून ती बीआयआयडी (बॉडी इंटीग्रिटी आयडेंटिटी डिसऑर्डर)ने ग्रस्त आहे. हा एक असा आजार आहे, ज्यामुळे पीडित लोक सामान्य म्हणून जन्मतात परंतु आपण दिव्यांग असायला हवे होते असे ते मानू लागतात. जेवेलने एका मुलाखतीत लहानपणापासूनच अंध होण्याची इच्छा होती असे सांगितले आहे.

वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षी मी अंधाऱ्या हॉलमध्ये चालायचे. तर वयाच्या सहाव्या वर्षी अंध होण्याबद्दल विचार केल्यावर मला बरे वाटायचे. किशोरवयीन झाल्यावर ब्रेललिपी शिकण्यास सुरुवात केली होती आणि वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत त्यात पारंगत झाल्याचे जेवेलने सांगितले आहे. स्वत:ची दृष्टीक्षमता गमावताना वेदना झाल्या. अंध झाल्यावर सर्व काही नीट होईल एवढाच विचार मी करत होते. रुग्णालयात जाण्यापूर्वी मी 30 मिनिटांपर्यंत प्रतीक्षा केली होती. डॉक्टरांनी तिच्या इच्छेविरोधात जात तिची दृष्टी वाचविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
मी एका उद्देशासह अंध झाले आहे. परंतु यामुळे माझे कुटुंबीयांसोबतचे नाते संपुष्टात आले आहे. पूर्वी कुटुंबाला हे एका दुर्घटनेमुळे घडल्याचे सांगितले होते. परंतु आई आणि बहिणीला सत्य समजल्यावर त्यांनी नातेच संपविले. परंतु या निर्णयाबद्दल मला किंचितही पश्चाताप नाही असे तिने म्हटले आहे.









