हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत ग्राहकांची मागणी
बेळगाव : हेस्कॉमची तक्रार निवारण मासिक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये वापरापेक्षा अधिक आलेले वीजबिल, मोबाईल अॅप्सद्वारे बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, याचबरोबर धोकादायक विद्युतवाहिन्या व ट्रान्स्फॉर्मर बदलणे अशा तक्रारी मांडण्यात आल्या. सर्व तक्रारींचा विचार करून लवकरच त्या सोडविल्या जातील, असे आश्वासन हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी दिले. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमची तक्रार निवारण बैठक घेतली जाते. नागरिकांना आपल्या विजेसंदर्भातील तक्रारी बैठकीमध्ये मांडता येतात. नेहरुनगर शहर उपविभाग 3 येथे झालेल्या बैठकीमध्ये आनंद दमण्णावर यांनी वापरापेक्षा अधिक वीजबिल येत असल्याची तक्रार हेस्कॉमकडे केली. त्यांच्या तक्रारीनुसार मीटर बदलण्यात आला. सोमण्णा वलिकार यांनी मोबाईल अॅप्सद्वारे वीजबिल भरणा बंद असल्याची तक्रार मांडली. हेस्कॉमने आपल्या वेबसाईटवरून बील भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबरोबरच इतर तक्रारी बैठकीदरम्यान मांडण्यात आल्या. बैठकीला हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते एम. शिंदे, सेक्शन ऑफिसर बी. एस. पवनकुमार, शीतल सनदी, धमेंद्र, पी. एल. मुल्ला यांसह हेस्कॉमचे अधिकारी व ग्राहक उपस्थित होते.









