गोकाक पोलिसांकडून आठ लाखाचा मुद्देमाल जप्त
संकेश्वर : दरोडा, हनीट्रॅप तसेच वाहन चोरीसह अनेक गंभीर गुन्हे असलेल्या कुख्यात गुंडांच्या टोळीला गजाआड करण्यात गोकाक पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 7 लाख 89 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींची गोकाक सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. गोकाक पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईबद्दल जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी कौतुक केले आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी, गुरुनाथ विरुपाक्षी बडिगेर (रा. कणसगेरी, ता. गोकाक) हे गोकाकहून आपल्या गावी कणसगेरीला जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गुरुनाथ यांची दुचाकी अडवत त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडील सोन्याची चेन, अंगठी घेऊन पोबारा केला. याप्रकरणी गुरुनाथ यांनी गोकाक पोलिसात फिर्याद दाखल केली होती. याबरोबरच अन्य ठिकाणीही चोरी व दरोड्याच्या घटना घडल्याच्या फिर्यादी नोंद झाल्या होत्या. या सर्व घटनांचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एम. वेणुगोपाल व गोकाकचे पोलीस उपआयुक्त डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे पोलीस निरीक्षक गोपाल राठोड यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नियुक्त करण्यात आले होते.
सोमवार दि. 18 रोजी सदर तपास पथकाने बेवचीनमरडी खिलारी व एसपी सरकार या कुख्यात गुंडांच्या टोळीला ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. यावेळी सदर टोळीकडून अशोक लेलँड ट्रक, टाटाएस मालवाहू, सात दुचाकी, रोकड, सोन्याचे दागिने व चोरीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी गज आणि तलवारी असा 7 लाख 89 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने तीन दरोडे व दोन हनीट्रॅप प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचीही कबुली दिली. त्यामुळे सदर 9 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची गोकाक सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. यावेळी जिल्हा पोलीसप्रमुखांनी सदर कारवाईत सहभागी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, एम. जी. गोरी, बी. व्ही. नेर्ली, व्ही. आर. नाईक, डी. जे. कुन्नूर, एस. व्ही. कस्तुरी, एस. एच. इरगार, एम. बी. गिनगेरी, एम. एम. हालुळी, जी. एम. गुडली, के. आय. किलीगंजी, एम. बी. तळवार यांचे कौतुक केले









