दुर्गंधीमुळे भाविकांची गैरसोय : तुंबलेल्या गटाराची त्वरित स्वच्छता करण्याची मंडळाची मागणी
बेळगाव : सोमवारी झालेल्या पावसाने पाटील गल्ली येथील भगतसिंग युवक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात गटारीचे पाणी शिरल्याने दुर्गंधी पसरली आहे. मंगळवारी श्री गणरायाचे आगमन होणार असल्याने अशा सांडपाण्याच्या अवस्थेत गणेश पूजन कसे करावे असा प्रश्न मंडळाला पडला आहे. तरी मनपाने गटारीतील कचरा काढून त्वरित स्वच्छता करावी, अशी मागणी या मंडळाने केली आहे.
मठ गल्ली येथील दोन कॉम्प्लेक्सचे पाणी या गटारीत सोडण्यात येते. मंडपाच्या बाजूला असलेली गटार कचरा व सांडपाण्याने भरल्याने या ठिकाणी पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात तर हे पाणी शनिमंदिर समोरून वाहात असते. सदर बाब नगरसेवकाच्या निदर्शनास आणूनही त्याकडे कानाडोळा केला असल्याचा आरोप मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.









