तीन दिवसांत 50 हून अधिक मोबाईल लांबविले
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झालेल्या प्रचंड गर्दीत मोबाईल चोरांचा उपद्रव वाढला आहे. दोन दिवसांत 35 हून अधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या असून खडेबाजार व मार्केट पोलिसांकडे सोमवारी रात्री उशिरापर्यंत तक्रारी करण्यासाठी येणाऱ्यांचा ओघ सुरूच होता. शनिवारपासून तीन दिवसांत 50 हून अधिक मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. खासकरून गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक परिसरात खरेदीसाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी गणपत गल्ली व खडेबाजार परिसरात 12 हून अधिक जणांचे मोबाईल चोरीस गेले आहेत. तर सोमवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 15 जणांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. मार्केट पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 5 हून अधिक मोबाईल पळविल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही दोन प्रवाशांचे मोबाईल पळविल्याच्या घटना घडल्या.
शनिवार दि. 16 रोजीही मोबाईल चोरीच्या घटना बाजारपेठेत घडल्या असून तीन दिवसांत 50 हून अधिक मोबाईल चोरीला गेले आहेत. मोबाईल चोरीची घटना लक्षात आल्यानंतर तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात येणाऱ्यांची संख्या रविवार व सोमवारी अधिक होती. चोरीचे मोबाईल शोधण्यासाठी आता सीईआयआर पोर्टलची मदत होते आहे. हरवलेले व चोरीचे मोबाईल शोधणे पोर्टलमुळे सोपे झाले आहे. चोरीच्या मोबाईलमध्ये आधीचे सीम काढून चोरट्यांनी नवे सीम घातले की लगेच त्याची माहिती सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलला मिळते. त्यामुळे मोबाईल चोर किंवा चोरीचे मोबाईल खरेदी करणारे अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडतात.









