Ukadiche Modak : उत्साह आणि आनंद द्विगुणित करणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. आज घरोघरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाली असेल. सकाळपासूनच बाप्पाच्या आवडीची खीर आणि मोदक बनवण्यात गृहिंणींची तारांबळ उडालीय. वाजत गाजत बाप्पा घरी आल्यावर त्याचे स्वागत आणि नैवद्य याची परिपूर्ण तयारी करण्यात अनेकजणी मग्न होत आहेत. पाच दिवसात वेग-वेगळे पदार्थ करून नैवद्य दाखवण्याचं अनेकींनी प्लॅनिंग केलेही असेल. मात्र या सगळ्या नैवद्यात बाप्पाची आवड म्हणजे मोदक. मोदक म्हटलं की ओल्या नारळाचे तळलेले किंवा उकडलेले हेच समीकरण. आजकाल बाजारात नाना तऱ्हेचे मोदक मिळतात. मात्र घरी केलेल्या मोदकाची चवच खूप भारी असते. तळीव मोदक सर्वांना जमतात,पण उकडीच्या मोदकाची रेसीपी हमखास अनेकींची फसतेच.पण काळजी करू नका आज तुम्हाला उकडीचे मोदक मऊ, लुसलुशीत कसे बनवावे आणि उकड बिघडू नये यासाठी खास टिप्स देणार आहोत. चला तर जाणून घेऊया रेसीपी.
सारणसाठी साहित्य
नारळ- 1 वाटी
गुळ-अर्धी वाटी
जायफळ- अर्धा चमचा
तुप- 1 चमचा
कृती
गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. यात आता तुप घाला. तुप गरम झाल्यावर त्यात खिसलेले खोबरे आणि नारळ घाला. आता हे मिश्रण तयार करून घ्या. मिश्रण करत असताना गुळ वितळेपर्यंतच गॅस चालू ठेवा. गुळ वितळला की गॅस बंद करा. त्यातनंतर जाय़फळ पावडर घालून थंड करण्यास ठेवा.
उकडीसाठी साहित्य
आंबेमोहर तांदुळ पीठ- दोन वाटी
एक वाटी-दुध
एक वाटी- पाणी
लोणी-अर्धा चमचा
मीठ-चवीनुसार
कृती
सुरवातीला गॅसवर भांड्यात दुध, पाणी एकत्र घालून उकळी काढून घ्या. यात आता लोणी आणि चवीनुसार मीठ घाला. आता गॅस बारीक करून पीठ घालून लाटण्याने एकजीव करून घ्या. त्यानंतर दोन मिनिट झाकण ठेवून द्या. यानंतर पांढऱ्या कपड्याला पाण्याचा शिंतोडा मारून पीठ घालून गार पाण्याचा शिंतोडा मारून एकजीव करून घ्या. आता पीठ मोकळे करून एक वाफ जाऊ द्या. यानंतर
पाण्याचा आणि तेलाचा हात लावून पीठ चांगले मळून घ्या. यानंतर पारी तयार करून मोदक वळून घ्या. आता 7 ते 8 मिनिट मोदक उकडून घ्या. तयार मोदकावर तुपाची धार सोडून बाप्पाला नैवद्य दाखवा. आणि तुम्हीही गरम-गरम सर्व्ह करा.









