बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वेरूळावरील काँक्रिटचे स्लीपर बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे रेल्वे दुसऱ्या व तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर येत आहेत. गणेशोत्सवामुळे प्रवाशांची झालेली गर्दी आणि त्यातच सुरू असलेले दुरुस्तीचे काम यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण, त्याचबरोबर विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी सिग्नलचे काम पूर्ण केले जात असून त्यासाठी काही रेल्वे पुढील आठवड्यात रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापूर्वी बेळगाव रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 1 वर रेल्वेमार्गाची दुरुस्ती करण्यात येत आहे. रेल्वेरूळाखाली घालण्यात आलेले काँक्रिटचे स्लीपर बदलण्यात येत आहेत. याचबरोबर काही ठिकाणी प्लॅटफॉर्मवरील फरशी खराब झाली असून त्या ठिकाणीही दुरुस्ती केली जात आहे.









