योग्य भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
बेळगाव : जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुक्यामधून वगळले आहे, असे असले तरी बेळगाव तालुक्यात बटाटा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्याच्या उत्तर भागातील गावांना भेट देऊन बटाटा व रताळी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. आंबेवाडी, गोजगा, होनगा, काकती, बेन्नाळी, हालगा, जाफरवाडी, कडोली, केदनूर, मण्णीकेरी, अगसगे, हंदिगनूर, चलवेनट्टी आदी गावामध्ये बटाटा लागवड केली आहे. यासह रताळी पिकांची लागवड केली आहे. पावसाअभावी बटाटा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बटाटा पीक बहरात असताना पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटलीव रोगाचे प्रमाण वाढल्याने किडीने बटाटा पीक फस्त केले आहे. यामुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याचे निश्चित आहे.
बागायत खात्याचे तालुका अधिकारी प्रविण महिंद्रकर व काकती उपविभागाच्या बागायत अधिकारी रुपा नासी यांनी कडोली, अगसगे, जाफरवाडी, हंदिगनूर आदी गावांना भेट देऊन शेतवाडीतील बटाटा पिकाची पाहणी केली. प्रत्येक झाडाला दोन ते तीन बटाटा गोटीच्या आकाराचे लागल्याचे अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात दिसून आले. दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी बटाटा पिकांचे मोठे नुकसान झाले असून योग्य भरपाई देण्याची मागणी केली. एकर बटाटा लागवडीसाठी 45 ते 50 हजार रुपये खर्च आला आहे. यंदा बटाट्याचा उतारा अपेक्षेनुसार मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे, असे सांगण्यात आले. यावेळी तालुका अधिकारी प्रविण महिंद्रकर म्हणाले, सरकारने बेळगाव व खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त भागात समावेश केला नसला तरी अहवाल मागविला आहे. त्यानुसार अहवाल देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव तालुक्यात 1500 एकर क्षेत्रात बटाटा लागवड करण्यात आली आहे. तर 5000 एकर क्षेत्रात रताळी पिकाची लागवड करण्यात आली आहे. पावसाअभावी रताळी पिकाचेही नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करून सरकारला अहवाल देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.









