सुधाकर काशीद,कोल्हापूर
समोर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ते विचारतात.. ‘शांताबाई जी कैसे हो.., अशा प्रसंगात थोड्या बावरलेल्या शांताबाई काय नाही बर आहे की.. एवढंच म्हणाल्या. आणि नंतर पंतप्रधानांकडून झालेल्या कौतुकाच्या वर्षावात अक्षरश: न्हाऊनच निघाल्या. आयुष्यभर गावात आणि आसपासच्या गावात दाढ्या करण्याचे, केस कापण्याचे काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या शांताबाई रविवारी दिल्लीत साऱ्या व्हीव्हीआयपीचे लक्ष वेधून गेल्या. आयुष्यभर हेच काम करणाऱ्या शांताबाईंना आपण हे जे वाट्याला आलेलं काम करतोय, ते इतकी दखल घेण्यासारखे असेल असे कधी वाटलेही नव्हते. कारण नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर चार पोरींना सांभाळत त्यांना मोठ्या करायचं म्हटल्यावर नवऱ्याचा दाढी वस्तारा आपल्यालाच हाती घ्यावा लागणार, एवढंच त्यांना त्या कठीण प्रसंगात माहीत होतं.
शांताबाई यादव गडहिंग्लज तालुक्यातल्या हसुर सासगिरी गावच्या. पती श्रीपती नाभिक व्यवसाय गावोगावी फिरून करायचे. गायी-म्हशींचे केस भादरायचे. त्यांना चांगुना, कोंडुबाई, पुष्पा व संगीता या चार मुली. मुली लहान असतानाच श्रीपतींचे अचानक निधन झाले व त्या क्षणापासून या चार मुलींचा सांभाळ करत उदरनिर्वाहाची जबाबदारी शांताबाईंवर आली. शेतीत मोलमजुरी करून तर घर चालणे शक्यच नव्हते. आता नवरा मागे सोडून गेलेला वस्तरा, कात्री, कंगवा हाती घेणे एवढेच उदरनिर्वाहाचे साधन त्यांना समोर दिसत होते. पण शांताबाईनी तसे ठरवले तरी त्यांच्याकडून सुरुवातीला दाढी व केस कापून घ्यायला कोण तयार होत नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी खांद्यावरच्या पिशवीत दाढी केस कापण्याचे साहित्य भरले व दारोदारी जाऊन त्या लोकांना केस कापून घेण्याची, दाढी करण्याची विनंती करू लागल्या.
सुरुवातीला या बाईने वस्तरा चालवताना कापले तर काय ही भीती होतीच. पण ही बाई व्यवस्थित केस कापेल का? ही देखील शंका होती. पण हळूहळू गावातील पुरुष मंडळी स्वत:हून पुढे येऊ लागली. शांताबाई.. कर हजामत म्हणून तिच्यापुढे मांडी घालून बसू लागली. हळूहळू शांताबाईंचा कात्री वस्ताऱ्यावरचा हात व्यवस्थित चालू लागला व ती घरात दुकान घालूनच हा व्यवसाय करू लागली. चार पोरींची लग्ने केली. स्वत:चा उदरनिर्वाह व्यवस्थित करू लागली. तिच्या या कामाचे कौतुक होऊ लागले. पण शांताबाईंनी या कौतुकाचा कधी फार विचार केला नाही. कारण त्यांना माहिती होतं, कात्री, वस्तरा आपण हाती घेतला नाही तर आपण जगू शकणार नाही.
शांताबाईंच्या या आगळ्यावेगळ्या कामाची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतली. विश्वकर्मा जयंती निमित्त रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात त्यांना निमंत्रित करण्यात आले. शांताबाई व त्यांची मुलगी दिल्लीला गेली. नरेंद्र मोदी शांताबाईंना भेटले. शांताबाईंशी बोलले. शांताबाई व्हय.. व्हय …व्हय म्हणत त्या बोलण्याला प्रतिसाद देत होत्या. एकदा बाबा कष्टाच चीज झालं.., असं म्हणत शांताबाई त्या क्षणी वेगळ्या समाधानाने भारावून गेल्या.