एक-दोन दिवसांत सदर खेळाडूंना एक्सप्रेस व्हिसा मिळणार, आज चीनशी सामना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील आशियाई खेळांत सहभागी होणार असलेला भारतीय फुटबॉल संघ रविवारी रवाना झाला असून या संघासोबत बचावपटू कोन्साम चिंगलेनसाना सिंग आणि लालचुंगनुंगा हे दोन प्रमुख खेळाडू गेलेले नाहीत. कारण त्यांचा व्हिसा तयार झालेला नाही. परंतु भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने या दोघांना त्यांचे प्रवासासाठीचे आवश्यक दस्तऐवज एक-दोन दिवसांत मिळतील असे सांगितले आहे.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आशियाई खेळांसाठी सादर केलेल्या 50 खेळाडूंच्या सुऊवातीच्या लांबलचक यादीत चिंगलेनसाना सिंग आणि लालचुंगनुंगा यांची नावे नव्हती. म्हणूनच, अंतिम क्षणी जाहीर करण्यात आलेल्या 22 सदस्यीय संघात त्यांचा समावेश करण्यात आला असला, तरी त्यांना अधिमान्यता मिळालेली नाही. भारताच्या आशियाई खेळांसाठीच्या पथकाचे प्रमुख भूपिंदरसिंग बाजवा यांनी सदर दोन्ही खेळाडू आशियाई खेळांना मुकण्याची भीती फेटाळली आहे. मात्र, आज मंगळवारी चीनविऊद्ध होणार असलेल्या पहिल्या सामन्यासाठी ते उपलब्ध नसतील.

मी आणि एआयएफएफचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी क्रीडा मंत्रालयाच्या पत्रासह दोन खेळाडूंच्या एक्सप्रेस व्हिसासाठी अर्ज केला आहे आणि हा व्हिसा उद्या किंवा परवा आला पाहिजे. चिनी दूतावासाने सांगितले आहे की, सर्वसामान्य व्हिसासाठी सात दिवस लागतात, परंतु एक्सप्रेस व्हिसाच्या मंजुरीसाठी फक्त दोन दिवस लागतात, असे बाजवा यांनी सांगितले आहे. सदर दोन्ही खेळाडू एक्सप्रेस व्हिसा घेऊन चीनला जातील आणि तेथे त्यांना अधिमान्यता मिळेल. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंना कोणतीही अडचण येऊ नये, असे ते पुढे म्हणाले.
त्यापूर्वी भारताचे मुख्य प्रशिक्षक इगोर स्टिमॅच यांनी सोमवारी ‘गेम्स व्हिलेज’मध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या संघाला लगेच मंगळवारी चीनच्या मजबूत संघाचा सामना करावा लागेल, याकडे लक्ष वेधले. इंडियन सुपर लीगमधील क्लबनी खेळाडूंना मोकळे न केल्यामुळे ‘एआयएफएफ’ला शेवटच्या क्षणी दुय्यम संघ उभा करावा लागलेला आहे. आजच्या चीनविऊद्धच्या सामन्यानंतर भारताचा सामना गट स्तरावर बांगलादेश (21 सप्टेंबर) आणि म्यानमारशी (24 सप्टेंबर) होईल.
संदेश झिंगन आणि प्रथम पसंतीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांच्यासह 13 खेळाडूंना त्यांच्या ‘आयएसएल’ क्लबनी सुऊवातीला मोकळे केले नव्हते. त्यामुळे जाहीर करण्यात आलेल्या 17 सदस्यीय संघातील सुनील छेत्री हे एकमेव लक्षणीय नाव होते. शुक्रवारी ‘एआयएफएफ’ने 22 खेळाडूंच्या सुधारित संघाची घोषणा केली. त्यात जोरदार चर्चेनंतर झिंगनसोबत कोन्साम चिंगलेनसाना सिंग आणि लालचुंगनुंगा या दोन वरिष्ठ खेळाडूंचा समावेश होऊ शकला.









