मांगल्याचे, चैतन्याचे नि आनंदाचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाला देशभरात आजपासून सुऊवात होत आहे. त्यामुळे पुढचे दहा दिवस हे समस्त गणेशभक्तांसाठी भारलेले असतील. मरगळलेल्या, हताश झालेल्या मनांना उभारी देणाऱ्या सण, उत्सवांना भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. सुखकर्ता, दु:खहर्ता म्हणून गणल्या जाणाऱ्या श्री गणेशाचा उत्सव हा तर उत्कटबिंदूच ठरावा. गणपती ही विद्येची, कलेची देवता म्हणून ओळखली जाते. स्वाभाविकच आद्यपूजेचा मानही गणरायाला देण्यात येतो. कोणत्याही मंगल कार्याचा आरंभ श्री गणेशाच्या साक्षीने करण्याची परंपरा पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. खरे तर कोकण, महाराष्ट्रासह इतर भागात घरोघरी गणपती बसविण्याची परंपरा पूर्वापार आहे. तथापि, सार्वजनिक गणेशोत्सवाला पुण्यातून सुऊवात झाली. ती नेमकी कोणत्या वर्षी झाली वा कुणी केली, याविषयी आपल्याकडे मतमतांतरे पहायला मिळतात. किंबहुना, गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यात लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी तसेच घोटावडेकर व खासगीवाले या सर्वांनी अमूल्य योगदान दिल्याचे जाणकार सांगतात. गणेशोत्सवामागची समाजधुरिणांची भूमिका ही अत्यंत स्वच्छ व विशाल होती. मात्र, त्याच्या खोलात न जाता नेमके सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते कोण, यावर आपण नाहक वाद घालत बसतो. स्वातंत्र्यलढ्याच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सवाद्वारे समाज एकत्र यावा, संघटित व्हावा, ही लोकमान्यांची अपेक्षा होती. लोकमान्य हे राष्ट्रीय नेते होते. त्यामुळे त्यांना एक वलय होते. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक भूमिकेला समाजात वजन होते. स्वाभाविकच त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप व दिशा दिली. भाऊसाहेब रंगारी हेही सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते होते. ब्रिटिश सत्ताऊपी असुराचा श्री गणेश नि:पात करीत असल्याची मूर्ती त्यांनी घडविली. त्यामागचा उद्देश स्वातंत्र्यलढ्यामध्ये या उत्सवाचा शस्त्र म्हणून उपयोग करण्याचा असल्याचे अधोरेखित होते. एकूणच गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांची एकजूट व्हावी, समाज म्हणून आपले बळ वाढावे, अशीच या साऱ्यांची मनोभूमिका असल्याचे दिसते. सार्वजनिक गणेशोत्सवाचा आज प्रचंड विस्तार झाला आहे. एकेकाळी, पुणे, मुंबई वा महाराष्ट्रातील काही शहरांपुरता सीमित असलेला हा उत्सव आता वेगवेगळ्या राज्यांबरोबरच सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे. तेथेही सर्व जण एकत्र येऊन गणेशोत्सवाचा आनंद घेताना पहायला मिळतात. मागच्या दोन ते तीन दशकांत मानवी जीवनशैलीत प्रचंड बदल झाले आहेत. धकाधकीच्या जीवनशैलीत माणसे गुरफुटून गेली आहेत. त्यामुळे माणसामाणसांमधील संवाद ओसरताना दिसत आहे. कौटुंबिक पातळीवरही आज हेच चित्र दृष्टीस पडते. अशा वेळी एकमेकांना जोडण्यासाठी इतका सुंदर दुसरा उत्सव नसावा. गणपती ही बुद्धीची देवता आहे. विचारांच्या या दैवताच्या साक्षीने आपापसांतील संवाद, वैचारिक देवाणघेवाण वाढत असेल, तर तो दुग्धशर्करायोग ठरावा. गणरायाचे आगमन ही प्रत्येकासाठी पर्वणीच असते. लहान, थोरांसह सर्वच जण गणरायाचे स्वागत करण्यासाठी आतुर असतात. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र आज गजाननाचे हर्षोल्हासात स्वागत होणार, हे वेगळे सांगावयास नको. पुण्यामुंबईतील गणेशोत्सवास आणि स्वागत व विसर्जन मिरवणुकीस आगळीवेगळी परंपरा आहे. छोट्या, मोठ्या बहुतेक मंडळांचा मिरवणुका काढण्याकडे कल असतो. त्याकरिता विविध पथकांना आमंत्रित करण्यात येते. या पथकांच्या सादरीकरणामुळे उत्सवाला एक प्रकारचा नाद, लय प्राप्त होते. मात्र, त्यांची संख्या किती असावी, याची मर्यादा मंडळांनी पाळणे गरजेचे होय. अन्यथा, त्यातला ताल हरवून तो कर्कश व्हायची भीती संभवते. काही गणेश मंडळे या काळात समोजोपयोगी उपक्रमास प्राधान्य देतात. अशा मंडळांकडून सर्वच मंडळांनी आदर्श घ्यायला हवा. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही धांगडधिंगा, कर्णकर्कशतेला फाटा देऊन उत्सव विधायक कसा करता येईल, यावर कटाक्ष ठेवायला हवा. विशेषत: विसर्जन मिरवणूक अधिक लांबू नये, याकरिता प्रयत्नशील रहायला पाहिजे. जगभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी चार वाजताच सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तो स्तुत्यच म्हटला पाहिजे. शहराशहरांतील इतर प्रमुख मंडळांनीही उत्सव अधिकाधिक समाजाभिमुख होण्यासह शांततेत व निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पुढाकार घेतला, तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील. गणरायाच्या कृपेने कोरोनाचे सावट आता दूर झाले पाहिजे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून महागाईचे चटके तीव्र होत आहेत. उत्सव काळातच महागाई भडकल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागेल. या महागाईपासून मुक्ती मिळावी. त्या अनुषंगाने धोरणे राबविण्याची सद्बुद्धी राज्यकर्त्यांना गणरायाने द्यावी, अशी प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा असेल. यंदा पावसानेही ताण दिला आहे. भारतात आत्तापर्यंत उणे 10 टक्के इतकी पावसाची नोंद झाल्याने देशावरील दुष्काळछाया गडद झाली आहे. शेती आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडले आहेत. विघ्नहर्त्या गजाननाने या संकटापासून सर्वांची मुक्तता करावी, अशी प्रार्थना असेल. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात गणरायाचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. ‘आकार चरण युगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारे ।। हे तिन्ही एकवटले । तेच शब्दब्रम्ह प्रगटले । ते मियां श्रीगुऊकृपा नमिले । आदिबीज ।।’ यातील शब्दब्रम्हत्व शब्दांपलीकडचे होय. ‘देवा तूचि गणेशु । सकल मतिप्रकाशू।’ हे माउलींनी गणरायाचे केलेले वर्णन अतिशय सार्थ असेच. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाजाशिवाय मानवी जीवनास अर्थ नाही. म्हणूनच माणसाने माणसाशी माणसासारखेच वागले पाहिजे. आपापसांतील साहचर्य, आपुलकी, प्रेम जपत भेदभाव, द्वेष, दुहीला मूठमाती द्यायला हवी.
Previous Articleवर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाला धक्का, ट्रेविस हेड जखमी
Next Article देशभर गणेश चतुर्थीची धामधूम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.