दिवसातून 1 हजार वेळा क्यूबाचा युवक करतो हे काम
जगात अत्यंत विचित्र लोक आहेत. अनेक जण स्वत:च्या कौशल्याने नाव कमावितात, तर काहीजण अजब कृती करून प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. अत्यंत विचित्र कृती करून लोकांचे लक्ष वेधणारा एक व्यक्ती क्यूबामध्ये राहतो. या व्यक्तीला क्यूबाचा आयर्नमॅन म्हटले जाते. या व्यक्तीने मागील 17 वर्षांपासून स्वत:च्या शरीरावर हातोड्याने वार करण्याचे सत्र चालविले आहे.
क्यूबात राहणारा 32 वर्षीय लीनो टोमासेन एक स्ट्रीट परफॉर्मर आहे. तो स्वत:च्या शरीरावर हातोड्याने वार करतो आणि तो दिवसातून 1 हजार वेळा हे करत असतो. लीनो वयाच्या 15 व्या वर्षापासून हे कृत्य करत आहे. त्याची स्ट्राँगमॅन प्रतिमा लोकांना अत्यंत पसंत पडते. तो रस्त्यावर लोकांसमोर स्वत:च्या शक्तीचे प्रदर्शन करताना दिसून येतो.

अनेकदा तो स्वत:च्या हाताचा वापर करत पुशअप करतो आणि त्यावेळी त्याच्या शरीरावर एक व्यक्ती बसलेला असतो. याचबरोबर तो स्वत:च्या शरीरावर हातोड्याने वार करतो. अनेकदा तो इतरांकडून हे वार करवून घेत असतो. आतापर्यंत त्याने स्वत:च्या शरीरावर लाखोवेळा वार केले आहेत. आपल्याला वेदना होत नसल्याचा दावा तो करत असतो.
लीनो पूर्वी एक बॉक्सर होता आणि स्वत:ला बॉक्सिंगसाठी तयार करायचा. हातोडा मारल्याने बॉक्सिंगच्या माराचा सराव होईल असे त्याचे मानणे होते. मेक्सिकोत त्याने 27 बॉक्सिंग मॅच नॉकआउटद्वारे जिंकले आहेत. परंतु आता त्याने बॉक्सिंग सोडले आहे. अखेरच्या फाइटमध्ये त्याने चुकून समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावर वार केला होता, यामुळे त्याच्या कवटीत फ्रॅक्चर होत तो तत्काळ मृत्युमुखी पडला होता. त्याने फाइटद्वारे जिंकलेले सुमारे 83 लाख रुपये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिले होते. रिंगमध्ये पुन्हा उतरण्यासाठी अनेक लोक लाखो रुपये देण्यास तयार आहेत, परंतु आता बॉक्सिंग न करण्याची शपथ घेतल्याचे लीनोने सांगितले आहे.









