विटा प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी सोलापूर जिल्ह्यातील कुख्यात दरोडेखोरांची टोळी विटा पोलिसांनी जेरबंद केली आहे. जितेंद्र भानुदास काळे (३०), सुखदेव शिवाजी काळे (३२), किरण शिवाजी काळे (२९), बालाजी माणिक पवार (२६, रा. सर्व मार्डी, ता. उत्तर सोलापूर), दादाराव लक्ष्मण पवार ( ४२ रा. राण मासळे, ता. उत्तर सोलापूर) आणि शिवाजी रामा काळे (२६, मुळ राहणार आणि ता जत, जि. सांगली, सध्या रा.मार्डी) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेली माहिती अशी, रविवारी 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून ५ ते ६ इसम सशस्त्र दरोडा टाकण्याच्या उद्देशाने विट्याकडे येत असल्याबाबत पोलीस ठाण्याचे हवालदार प्रमोद साखरपे यांना टीप मिळाली होती. त्यानंतर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यातील अधिकारी, अंमलदार आणि दोन पंचाना वेगळी ४ पथके तयार केली. त्यांना सूचना देवून विटा ते भिवघाट जाणारे मार्गावर सर्व पथकासह रेणावी घाटामध्ये नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी भिवघाट कडून एक पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी येवुन मुळ स्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबली. त्या गाडीचा संशय आल्याने पोलिसांनी गाडीस गराडा घातला. गाडीत एकुण सहाजण होते, त्यांना खाली उतरवून त्यांची अंगझडती घेतली असता एक लोखंडी कटवणी, एक मोठी पक्कड,एक लाकडी मूठ असलेला कोयता, एक लाकडी दांडके,नायलॉन दोरी, चाकू,स्क्रू ड्रायव्हर आणि मिरची पुड असे साहित्य आढळून आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी विटा येथे दरोडा टाकुन पैसा व सोने चोरण्यासाठी आलो, अशी कबूली दिली, असे फिर्यादीत म्हंटल्याचे पोलिस निरीक्षक डोके यांनी सांगितले.
संशयितांना ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्याकडून रोख ९ हजार ६०० रुपये, चार मोबाईल फोन आणि गुन्ह्यासाठी वापरलेली साडेपाच लाख रुपयांची गाडी असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील जितेंद्र काळे, सुखदेव काळे, किरण काळे, बालाजी पवार, दादाराव पवार आणि शिवाजी काळे हे सहाही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापुर्वी अनेक चोऱ्या, दरोडा यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक डोके यांनी दिली.
सोमवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडे आणखी तपास करुन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली केली, असेही पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले.