प्रतिनिधी,कोल्हापूर
Ganesh Utsav Kolhapur : राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील जय शिवराय तरुण मंडळाने आपली तांत्रिक देखाव्याची परंपरा कायम राखत ‘बालाजी अवतार’ हा तांत्रिक देखावा सादर करणार आहे. वीस फुटाच्या वारूळातून 17 फुट उंच तिरूपती बालाजीच्या मूर्तीचा अवतार देखाव्याचे मुख्य आकर्षन आहे. याची जय्यत तयारी सुरू असुन, तंत्रज्ञ व मंडळाचे कार्यकर्ते देखावा वेळेत सुरू होण्यासाठी आहोरात्र झटत आहेत.
देखाव्यामध्ये ऋषी,नारद,शंकर-पार्वती,ब्रह्मा,सरस्वती,विष्णू,लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत.तसेच हुबेहूब दिसणारी गुराखी व गाय यांची प्रतिकृती बनवली आहे.जमिनीपासून 17 फूट उंच भव्य हालती बालाजीची मूर्ती 20 फुटाचे वारुळ फोडून बाहेर येणार आहे असा हा सहा मिनिटाचा देखावा आहे.गणरायाचे आगमनानंतर सर्वांना वेध लागतात ते देखाव्याचे.
घरगुती गणपतीचे विसर्जन होताच सर्वच मंडळांचे देखावे सुरू होतात. देखावे पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी उसळते.राजारामपुरीला तांत्रिक तसेच प्रबोधनात्मक देखाव्याची परंपरा आहे.जय शिवराय तरूण मंडळाच्या बालाजी अवतार या तांत्रिक देखाव्यातून तिरूपती बालाजीचे दर्शन होणार आहे. देखाव्यातील बहुतांशी हालचाली हायड्रोलिक पंपावर होणार आहेत.देखावा साकारण्यासाठी 15 तंत्रज्ञ व मंडळाचे कार्यकर्ते आहेरात्र झटत आहेत.यंदाच्या गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असुन देखाव्यांची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.आत्तापर्यंत जय शिवराय तरूण मंडळाने तांत्रिक देखाव्यासह सामाजिक प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत.मंडळाला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.अबालवृद्धांमध्ये या देखाव्याचे आकर्षन असुन गर्दीचा उच्चांक होईल,असे मंडळाचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी व कार्याध्यक्ष धनराज माने यांनी सांगितले.
तांत्रिक देखाव्याची परंपरा
जय शिवराय तरूण मंडळाला तांत्रिक देखाव्याची परंपरा आहे.फिल्म इंडस्ट्रीला 101 वर्षे पुर्ण झाल्याचे औचित्य साधुन 2015 साली सर्कस या चित्रपटातील देखावा साकारण्यात आला होता.दिवंगत प्रसिद्ध अभिनेते राज कपुर यांची यांची प्रतिकृती उभारून जीना यहाँ… मरना यहाँ.. या गीताच्या देखाव्यासह सर्कसमधील विविध पात्र उभा केले होते. 2016 साली मुंबईतील झवेरी बॉम्बस्फोटाचा देखावा गाजला होता. त्यानंतर 2017 साली बजरंगी भाईजानमधील 35 फुट उंचीची आकाशात 60 फुट हवेत झेपावणारी हनुमानाची प्रतिकृती उभारली होती. 2018 ला दहीहंडीच्या थराराचा देखावा साकरला होता.यानंतर श्रीराम व लक्ष्मण यांना खांद्यावर घेवून 45 फुट आकाशात झेपावणारा हनुमान, कथा श्रीकृष्ण जन्माची, कंस वध, शेषनाग आदी देखावे साकारले होते.
कोरोणा व महापुर काळात सामाजिक उपक्रम
कोरोणा तसेच 2019 व 2021 साली आलेल्या महापुराच्या संकटकाळात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता.जमा झालेल्या वर्गणीतून आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, बुस्टर डोसचे वाटप करण्यात आले होते.पुरग्रसत भागात मदतकार्य करण्यात आले होते.









